आयुष्य म्हणजे शरिराची मनाशी आणि मनाची शरिराशी स्पर्धा !
‘आयुष्य म्हटले की, डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखे लगेच पुढील चित्र उभे रहाते. सकाळी उठण्यासाठी गजर (अलार्म) लावून झोपणे, वेळेवर (टायमिंगची) रेल्वे मिळवण्यासाठी धावपळ करणे, रेल्वेमधील गर्दी आणि त्यांच्या आपल्या मानत चाललेल्या विविधरंगी गप्पा, नोकरीला गेल्यावर वरिष्ठ अन् सहकारी यांच्याशी चालू असलेली स्पर्धा, भूक नसली, तरी जेवणाच्या सुट्टीतच (लंच टाइममध्ये) जेवणे, (भूक लागते सकाळी ११.०० वाजता आणि जेवतो १.०० वाजता), संध्याकाळी उद्याच्या कामाचे नियोजन करत परतीचा प्रवास करणे, घरी गेल्यावर घरातील तणाव वेगळाच असणे, अशी स्थिती दिवसभर उणे-अधिक प्रमाणात सर्वांचीच असते.
१. मनुष्य विचारशील प्राणी; पण इतकाही अतिरेक बरा नव्हे…
खरच सांगा, याला जीवन म्हणतात का ? समाजात रहायचे, तर समाजाप्रमाणे वाटचाल केली पाहिजे; पण हे सर्व आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती स्वस्थ ठेवून केले पाहिजे, नाही तर एकापेक्षा एक भयावह राक्षस मागे लागतील. ते मागे लागणारे भयावह राक्षस पुढीलप्रमाणे आहेत.
अ. निद्रानाश
आ. अपचन
इ. हृदयासंबंधी तक्रारी
ई. पक्षाघात
उ. उच्च रक्तदाब
ऊ. मधुमेह
ए. स्थौल्य
ऐ. डोकेदुखी
ओ. मानसविकार
अशा या न संपणार्या जीवनाच्या चित्रपटामध्ये थोडा ‘इंटरव्हल’ (विश्रांती) असतो. त्याप्रमाणे आठवडाभर कामाची मर मर करून जेव्हा कधी मध्येच वेळ मिळेल, तेव्हा शारीरिक आणि मानसिक ताणाला शांत करण्यासाठी आयुर्वेदामध्ये शिरोधारा, शिरोभ्यंग अन् पादाभ्यंग सांगितले आहे.
२. मनःशांती उपचारपद्धत (मानस व्याधींसाठी)
काळ आणि शरीर यांची आवश्यकता ओळखून ‘मनःशांती उपचारपद्धत’ येथे देत आहोत.
अ. सर्वांग अभ्यंग : औषधी सिद्ध तेलाने सर्वांगास हलक्या हाताने मसाज करणे
आ. सर्वांग स्वेदन : औषधी काढ्याने सर्वांगास पेटीत (वेष्टित) झोपवून वाफ देणे आणि घाम काढणे
इ. पादाभ्यंग : काश्याच्या (कांस्य या धातूपासून बनवलेली वाटी) वाटीने दोन्ही पायाचे तळवे घासून घेणे
ई. शिरोभ्यंग : औषधी सिद्ध तेलाने डोक्यास हलक्या हाताने मसाज करणे
उ. शिरोधारा : औषधी सिद्ध तेल, दूध, काढा आणि ताक इत्यादींनेे दोन्ही भुवयांमध्ये आज्ञाचक्रावर सतत धार धरणे
शिरोधारेने निद्रानाश, उच्च रक्तदाब, पोटाचे विकार, त्वचा विकार, मानसिक तणाव आणि शारीरिक दुर्बलता असे काही आजार बरे करता येतात.
३. योगाभ्यास करण्याचे महत्त्व
शरीर आणि मन यांचा लपंडाव कायमचा दूर करायचा असेल, तर आयुर्वेदात सांगितलेल्या अन् सर्व जगाने मान्य केलेल्या योगशास्त्राचे नित्य नियमाने आचरण करावे. ‘पतंजलि’ योगशास्त्रात शरीर आणि मन यांची घडी घट्ट बसवायची असल्यास श्वासाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. या श्वासावर कार्य करणारे शास्त्र म्हणजे योगशास्त्र. गर्भावस्थेत बाळ गर्भाच्या उदरात ‘सोहम्’ साधनेत असते आणि प्रसुतीनंतर ते ‘कोहम्’ साधनेत येते. आपल्या प्रत्येकाला निसर्गाची निरव शांतता हवीहवीशी वाटते; कारण ती मातृगर्भाची आठवण देणारी असते आणि योगाभ्यास नेमके तेच शिकवते. आपल्या शरिरात प्रत्येक अवयवाला प्राणवायू न्यून (कमी) पडला की, त्याची चिडचिड चालू होते आणि त्यातूनच आजारांची निर्मिती होते. जर योगाभ्यासाने आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत राहिला, तर शरीर आजारी पडेल का ? याचा विचार करा.
अ. दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम, ॐ कार, भ्रामरी यांसारखे प्राणायाम फुप्फुसाचे प्राणवायू वहन करण्याची क्षमता वाढवतात.
आ. शित्त्तली शित्तकारी हे प्राणायामाचे प्रकार शरिरातील उष्णता न्यून करतात.
इ. भ्रस्तिका, कपालभाती हे प्राणायामाचे प्रकार शरिरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास साहाय्य करतात.
वरील सर्व प्राणायाम आपल्या दैनंदिन जीवनात पुष्कळ मोलाचे ठरतात; पण आरंभीला ते योगप्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे. त्यामुळे त्यातील बारकावे आणि ते करण्याची योग्य पद्धत तुमच्या लक्षात येईल अन् त्याचे लाभ शरीर, तसेच मन यांना होतील.’
– डॉ. दीपक केसरकर
(साभार : ‘श्री गजानन आशिष’, मे २०१९)