धर्मटीकाकारांना विरोध करा !
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि ‘द्रमुक’चे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन हिंदु धर्मावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केलेली आहे. ‘सनातन धर्म रोगाप्रमाणे आहे आणि तो संपवायला पाहिजे’, हे त्यांचे वक्तव्य अत्यंत गंभीर आहे. सनातन धर्माचा अभ्यास नसतांना धर्मावर एका उत्तरदायी व्यक्तीने जाणूनबुजून टीका करणे, हे हिंदूंना डिवचणारे ठरते. अशा एका उदयनिधीचा अपराध पोटात घातला, तर असे कितीतरी उदयनिधी डोके वर काढायला वेळ लागणार नाही. जिथे धर्महानी होत असते, तिथे राष्ट्रहानी होत असते. त्यामुळे ईश्वराची अवकृपा होऊन भयंकर परिणाम जनतेला भोगावे लागतात. ‘धर्मो रक्षित रक्षितः ।’ म्हणजे ‘जे धर्माचे रक्षण करतात, त्यांचेच धर्म रक्षण करतो.’ धर्माची अवहेलना करणार्यांना देव क्षमा करत नाही; परंतु सर्वसामान्य जनतेसाठी मात्र ‘धर्मासाठी आपण काय करत आहोत ?’, हे तितकेच महत्त्वाचे ठरतेे.
जो धर्मावरील टीका मूकपणे सहन करतो आणि त्याच्या विरोधात आवाज उठवत नाही, तोही त्या अधर्मियांच्या पापात तितकाच सहभागी ठरतो. त्यासाठी प्रत्येक हिंदु नागरिकाने हिंदु धर्मावरील टीकेला कडाडून विरोध करण्याचे दायित्व पार पाडून धर्मकर्तव्य बजावले पाहिजे, तरच सनातन धर्मामध्ये जन्मास येऊन काही केल्याचे समाधान प्राप्त होईल. म्हणूनच उदयनिधीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासमवेतच दुसरा उदयनिधी निर्माण होणार नाही, यासाठीही कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. उदयनिधी यांच्या पाठोपाठ अनेकांनी अशा प्रकारे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याची मालिकाच चालू केली आहे. जरी हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग असला, तरी ते फोफावू न देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी सडेतोडपणे वैचारिक विरोध करण्यासमवेतच शासनाला या सर्व मंडळींवर कडक कारवाई करण्याच्या संदर्भात भाग पाडणेही तितकेच आवश्यक आहे. अशांना न्यायालयात खेचून शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणे, हे तेथील जनतेचे कर्तव्य आहे. या घटनेच्या निमित्ताने हिंदूंना धर्मशिक्षणाची आणि त्यांच्यात धर्माभिमान निर्माण होण्याची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते. धर्मशिक्षण नसल्यामुळे आई-वडीलही मुलांमध्ये धार्मिक अस्मिता निर्माण करण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे आजच्या शिक्षित पिढीला उदयनिधी यांच्यासारख्या पुढार्यांकडून पसरवले जाणारे अज्ञानच खरे वाटू शकते; त्याचे परिणाम सध्या धर्मांतराच्या रूपानेही दिसत आहेत; म्हणून धर्मावर टीका करणार्यांचा जोरदार निषेध करणे अपरिहार्य ठरते !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.