सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पं. केशव गिंडे यांना शास्त्रीय संगीताचा पुरस्कार घोषित !
पुणे, १३ सप्टेंबर (वार्ता.) – ‘गानवर्धन संस्था, पुणे’ आणि ‘तात्यासाहेब नातू फाऊंडेशन’च्या यांच्या वतीने ज्येष्ठ बासरीवादक, संशोधक आणि विचारवंत पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे, असे ‘गानवर्धन संस्थे’चे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी घोषित केले. ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार यांसाठी गेली ४४ वर्षे सातत्याने कार्य करत आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात भरीव योगदान देणार्या कलाकारांना गेल्या ११ वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या हस्ते १७ सप्टेंबर या दिवशी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पू. पंडित केशव गिंडे आणि त्यांच्या शिष्यवर्गाचे बासरीवादन होणार आहे.