मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची सरकारला ३० दिवसांची मुदत !
उपोषण स्थगित करण्यास सिद्ध; मात्र आंदोलन चालू ठेवणार !
जालना – मराठा आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला ३० दिवसांची मुदत दिली आहे. ३० दिवसांत आरक्षण न दिल्यास ३१ व्या दिवसापासून पुन्हा उपोषणाला प्रारंभ करणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घोषित केली; मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले आल्यावरच उपोषण सोडणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी या कारणामुळं सरकारला एक महिन्याचा वेळ दिलाय pic.twitter.com/40Mg6j70H5
— Mumbai Tak (@mumbaitak) September 12, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनानंतर मागील १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे; मात्र आहे त्या ठिकाणी बसून आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका मनोज जरांने यांनी घेतली आहे. याविषयी भूमिका मांडतांना मनोज जरांगे म्हणाले, ‘‘केवळ जातीसाठी मी २ पावले मागे जात आहे; परंतु ३१ व्या दिवशी मी पुन्हा आमरण उपोषण करेन. त्यानंतर ‘सलाईन’, पाणी किंवा काहीच घेणार नाही. ज्या दिवशी जातीचे प्रमाणपत्र हातात मिळेल, त्या दिवशी आमरण उपोषण सोडेन. ३० दिवसांत आरक्षण दिले नाही, तर सर्व मंत्र्यांना महाराष्ट्राची सीमा ओलांडू देणार नाही. आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत येथून हालणार नाही. सर्वांना शिस्त लावा. महिनाभर गावागावांत साखळी उपोषण चालवायचे आहे.’’