देवद आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांचा जीवनप्रवास !

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने यांना निज श्रावण कृष्‍ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्‍यानिमित्त त्‍यांचा जीवनप्रवास येथे देत आहोत. १२ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात श्री. वसाने यांच्‍या साधनेत येण्‍यापूर्वीच्‍या जीवनाविषयी जाणून घेतले. आज पुढील भाग पाहू.

श्री. यशवंत वसाने

२. साधनेत आल्‍यानंतरची वाटचाल

२ अ. सनातन संस्‍थेशी जोडले जाणे

२ अ १. सनातन संस्‍थेचे संत पू. शिवाजी वटकरकाका यांच्‍याशी परिचय होणे : ‘माझी कार्यालयीन निवासी व्‍यवस्‍था मंडाळा गाव (अणूशक्‍तीनगर, मुंबई) येथे होती. तेथे वास्‍तव्‍यास असतांना मानखुर्द (मुंबई) या गावी श्री. शिवाजी वटकरकाका (आताचे सनातन संस्‍थेचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकरकाका.) यांचे निवासस्‍थान होते. त्‍यामुळे घराकडे जाता-येता माझा त्‍यांच्‍याशी वरवरचा परिचय झाला होता. एकदा त्‍यांनी मला थांबवून माझी ओळख करून घेतली. मला त्‍यांचे बोलणे आवडायचे. थोड्याच दिवसांत आमची मैत्री झाली. एक दिवस त्‍यांनी मला एका सत्‍संगाचे निमंत्रण दिले. मला त्‍यांना ‘नाही’ म्‍हणवले नाही.

२ अ २. व्‍यावहारिक गोष्‍टींमुळे साधनेसाठी वेळ न मिळणे; परंतु पू. वटकरकाका यांनी श्री. वसाने यांना साधनेत आणण्‍याचे प्रयत्न न सोडणे : त्‍या वेळी मी वेतना व्‍यतिरीक्‍त बाहेरची कामेही करायचो. त्‍यामुळे मी सुट्टीच्‍या दिवशीही बाहेरच असायचो. त्‍यामुळे सत्‍संगाला जायला आणि साधना करायला मला वेळ मिळत नसे. त्‍यामुळे मी पू. वटकरकाकांना टाळण्‍याचा प्रयत्न करू लागलो; पण त्‍यांनी मला साधनेत आणण्‍याचा प्रयत्न सोडला नाही. ते नेहमी घरी यायचे; पण मी कामासाठी सतत बाहेरच असल्‍याने त्‍यांची माझी भेट व्‍हायची नाही.

२ आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट : एक दिवस ते मला मुंबई येथील प.पू. डॉक्‍टरांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) निवासस्‍थानी असलेल्‍या सेवाकेंद्रात घेऊन गेले. तेव्‍हा तेथे प्रथमच माझी आणि प.पू. डॉक्‍टरांची भेट झाली.

पू. वटकरकाकांनी माझा त्‍यांच्‍याशी परिचय करून दिला. प.पू. डॉक्‍टरांशी भेट होऊन त्‍यांच्‍याशी संभाषण झाल्‍यावर मला पुनःपुन्‍हा सेवाकेंद्रात जावेेसे वाटू लागले.

२ इ. साधनेला प्रत्‍यक्ष आरंभ : नंतर पू. काकांसमवेत माझे नेहमी जाणे-येणे होऊ लागले. असेच एक दिवस माझे आणि प.पू. डॉक्‍टरांचे मी करत असलेल्‍या बाहेरच्‍या कामाविषयी बोलणे झाले. त्‍यावर त्‍यांनी त्‍वरित सांगितले, ‘‘साधनेला वेळ द्या.’’ दुसर्‍या दिवसापासून बाहेरची सर्व कामे, संपर्क बंद केले आणि प.पू. डॉक्‍टरांकडे जाऊ लागलो. तेव्‍हापासून माझ्‍यात साधनेसंदर्भात सकारात्‍मकता येऊ लागली. पू. वटकरकाका यांच्‍या समवेत वारंवार गुरुदेवांची भेट होऊ लागली.

२ ई. सेवेला आरंभ : प.पू. डॉक्‍टर प्रसाराच्‍या सेवेचे एकेक दायित्‍व मला देत गेले. त्‍यांनी त्‍या वेळी मानखुर्द, चेंबूर इत्‍यादी नवीन केंद्रे बनवून त्‍यांचे दायित्‍व माझ्‍याकडे दिले. मला नको वाटायचे; पण प.पू. डॉक्‍टर स्‍वतः सांगत असल्‍याने मला ते टाळताही येत नसे.

२ उ. स्‍वभावात पालट होणे : हळूहळू माझ्‍या कुटुंबियांना माझ्‍या स्‍वभावात पालट जाणवायला लागला. माझ्‍यात असलेला रागीटपणा, हट्टीपणा, अहंकारीपणा उणावू लागल्‍याचे माझी पत्नी (कै.) सौ. हेमलता पू. वटकरकाका यांना सांगू लागली.

२ ऊ. पत्नी (कै.) सौ. हेमलता वसाने हिची साधना : माझी पत्नी (कै.) सौ. हेमलता त्‍या वेळी शेगाव येथील संत गजानन महाराज यांची भक्‍ती करत असे. ती त्‍यांच्‍या ग्रंथाचे पारायण करणे, उपवास करणे, वर्षातून एकदा शेगावला जाणे, तेथे ३ दिवस गजानन महाराजांच्‍या पोथीचे पारायण करणे इत्‍यादी साधना करत असे. माझ्‍यात झालेला पालट पाहून तीसुद्धा सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार पू. वटकरकाका सांगतील ती साधना आणि सेवा करू लागली.

२ ए. पूर्णपणे सनातनमध्‍ये सहभागी होणे

२ ए १. पू. वटकरकाका यांनी मुलीलाही साधनेकडे वळवणे अन् त्‍यामुळे संपूर्ण कुटुंब साधना करू लागणे : कालांतराने पू. वटकरकाका आमच्‍याच घरातील घटक बनले. त्‍या वेळी माझी मुलगी कु. शिल्‍पा वसाने हिलाही पू. वटकरकाका यांनी साधनेकडे वळवले. त्‍यांनी तिचीही प.पू. डॉक्‍टरांशी ओळख करून दिली. आम्‍हीही तिला त्‍यांच्‍या चरणी सेवेसाठी सोपवले. ती त्‍या वेळी रुईया महाविद्यालयात पदवीच्‍या (कला शाखेच्‍या) दुसर्‍या वर्षाला शिकत होती. ती प्रतिदिन सेवेसाठी सायन सेवाकेंद्रात जाऊ लागली आणि प.पू. डॉक्‍टर सांगतील, ती सेवा करू लागली. प.पू. डॉक्‍टर आणि सौ. कुंदाताई तिचे सर्वस्‍व झाले. ते सांगतील त्‍याप्रमाणे ती करत असे. ही सर्व पू. वटकरकाकांची शिकवण ! त्‍यांनी आमच्‍या पूर्ण कुटुंबात परिवर्तन घडवून आम्‍हाला साधनेत योग्‍य मार्गावर आणले आणि प.पू. डॉक्‍टरांच्‍या चरणांशी सोपवले. त्‍यानंतर १९९६ ची गुरुपौर्णिमा झाली. मी सहकुटुंब सांगली येथे गुरुपौर्णिमेला गेलो होतो. तेव्‍हापासून मी पूर्णपणे सनातनमध्‍ये सहभागी झालो.

२ ए २. प्रत्‍येक शनिवारी आणि रविवारी २ दिवस कार्यालयाला सुटी असल्‍याने त्‍या दिवसांत सोलापूर येथे प्रसारासाठी जाणे : प.पू. डॉक्‍टर मलाही पू. वटकरकाका यांच्‍या समवेत सेवेसाठी जोडत गेले. त्‍याच वेळी सोलापूर येथे प्रसाराचे नियोजन केले गेले. त्‍या वेळी पू. वटकरकाका आणि मी दोघेही शासकीय नोकरीत होतो. आम्‍हाला प्रत्‍येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असे. त्‍यामुळे या सुट्टीचा आम्‍हाला लाभ होत असे. प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेने आम्‍ही दोघे प्रत्‍येक शुक्रवारी रात्री १० वाजता रेल्‍वेने सोलापूर येथे जायचो. शनिवार आणि रविवार २ दिवस प्रचार – प्रसार, संपर्क इत्‍यादी करून रविवारी रात्री १० वाजता रेल्‍वेने परत मुंबईसाठी निघायचो अन् सोमवारी सकाळी कार्यालयात जायचो. अशा प्रकारे प.पू. गुरुदेवांनी आमच्‍याकडून नियमितपणे ७ – ८ मास सेवा करवून घेतली.

(क्रमशः)

– श्री. यशवंत दौलतराव वसाने (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०२३)