नाशिक येथील महापालिकेकडून गणेशोत्सव मंडळांना ७५० रुपयांचे शुल्क माफ !
निर्णयाचे गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत !
नाशिक – सार्वजनिक गणेशोत्सवात महानगरपालिकेच्या जागेवर मंडप, व्यासपीठ आणि कमानी यांसाठी शहरातील १ सहस्र २०० गणेशोत्सव मंडळांना ७५० रुपयांची शुल्क माफी देण्याचा प्रस्ताव येथील महापालिकेच्या महासभेत संमत झाला असून तसे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत; मात्र वाणिज्य स्वरूपाचे विज्ञापन घेणार्या मंडळांना विज्ञापनशुल्क भरणे अनिवार्य केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित बैठकीत ‘आरास मंडप व्यासपिठाच्या अनुमतीसाठी लागणारे शुल्क माफ करण्यात यावे’, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली होती. त्या अनुषंगाने हा विषय महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. मंडप शुल्काचा प्रश्न मिटल्याने वीजमीटर घेण्याचा प्रश्नही सुटण्यास साहाय्य होणार असून महापालिकेच्या या निर्णयाचे गणेशोत्सव मंडळांनी उत्साहात स्वागत केले आहे.