निव्वळ व्रतस्थ आयुष्य जगणार्या अहिल्यादेवी होळकर !
आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
अहिल्याबाईना त्यांच्या खासगी आयुष्यात फार कमी सुखाचे दिवस लाभले. त्यांचे पती फार लवकर गेले. त्या काळच्या रितीप्रमाणे सती जायला निघालेल्या अहिल्याबाईंना मल्हाररावांनी मागे खेचले, ते तिच्या राज्याप्रती असलेल्या कर्तव्यांची आठवण करून देऊन ! मल्हाररावांच्या शब्दाखातर अहिल्याबाईंनी सतीचे वाण खाली ठेवले आणि त्यानंतर जे आयुष्य त्या जगल्या ते निव्वळ व्रतस्थ होते. त्यांना दीर्घायुष्य लाभले. थोरले बाजीराव पेशवे ते नारायणराव ही पेशवाईतील स्थित्यंतरे त्यांनी जवळून बघितली, पानिपतचा दारुण पराभव आणि राघोबादादांची कारस्थाने बघितली, ब्रिटिशांची भारत देशावरची हळूहळू घट्ट होणारी पकड बघितली अन् त्यांच्या डोळ्यांसमोर इतकी राजकीय स्थित्यंतरे घडत असतांना त्यांनी होळकरांच्या त्या चिमुकल्या संस्थानात न्याय आणि सुबत्ता तर राखलीच; पण देशभर धर्माचे काम म्हणून परकीय मुसलमानांनी उद़्ध्वस्त केलेली मंदिरे परत बांधली, गोरगरिबांसाठी जागोजागी धर्मशाळा बांधल्या, नद्यांना घाट बांधले आणि हे सर्व केले तेही स्वतःच्या खासगी मिळकतीतून ! जेव्हा अहिल्यादेवींनी सोमनाथ आणि काशीला नवीन शिवालये बांधण्याचे ठरवले, तेव्हा त्या नुसती दगड-मातीच्या इमारती उभारत नव्हत्या, तर त्या उभारत होत्या सर्वसामान्य हिंदूंचे धाडस ! त्यांनी आयुष्यभर अनेक आघात झेलले; पण त्या कायम जगल्या निव्वळ रयतेसाठी. निष्कलंक चारित्र्याच्या, व्रतस्थ प्रशासक असलेल्या या कणखर स्त्रीचे चारित्र्य खरोखरच प्रेरक असेच आहे.
– शेफाली वैद्य (साभार : फेसबुक)