पावसाळ्यानंतर ‘हत्ती हटवा’ मोहीम राबवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
|
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती आणि अन्य वन्य प्राण्यांकडून शेती आणि बागायती यांची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे, तसेच इतरत्रही वन्य प्राण्यांकडून हानी करणे चालू आहे. या पार्श्वभूमीवर हानीभरपाई वाढवून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून लवकरच याविषयी शासन निर्णय घेणार आहे, तसेच हत्तींची समस्या कायमची सोडवण्यासाठी पावसाळ्यानंतर हत्ती हटवा मोहीम राबवण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री तथा येथील आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्यात हत्तींपासून होणार्या हानीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी ११ सप्टेंबर या दिवशी येथील वन विभागाच्या कार्यालयात ‘हत्ती हटवा’ समितीचे प्रमुख, तसेच स्थानिक शेतकरी यांच्यासह बैठक आयोजित केली होती. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपवनसंरक्षक एस्. नवकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित शेतकरी आणि बागायतदार यांनी वन्य प्राण्यांमुळे होणार्या हानीची भरपाई वाढवून मिळावी, नारळ पीक कोकणात मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने, त्यासाठी वेगळा निकष लावून अधिकची हानीभरपाई द्यावी, यासह अन्य मागण्या केल्या.
सर्वांचा एकत्रित विचार करून मंत्री केसरकर यांनी सांगितले की, भातशेतीसाठी प्रतिगुंठा ७०० रुपये, केळीसाठी प्रतिझाड ४०० रुपये, नारळाच्या मोठ्या झाडाला ३० सहस्र रुपये, तर लहान झाडाला १५ सहस्र रुपये हानीभरपाई देण्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, तसेच पावसाळ्यानंतर हत्ती हटवा मोहीम राबवण्यात येणार असून तोपर्यंत या मोहिमेचे अधिकारी येथे येऊन पहाणी करतील.
या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर, शैलेश दळवी, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, हत्तीबाधित क्षेत्र समितीचे सदस्य पंकज गवस, संतोष गवस, विष्णु देसाई, गोपाळ गवस यांच्यासह हत्तीबाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.