गोवा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर सेवेतून निलंबित

  • दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे मशिदीत पाठवल्याचे प्रकरण

  • ‘पी.एफ्.आय्.’ या संघटनेशी संलग्नित विद्यार्थी संघटनेच्या आवाहनाने प्रभावित होऊन प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवल्याचे उघड !

‘स्कूल जिहाद’चा प्रकार !

वास्को, ११ सप्टेंबर (वार्ता.) – दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालय या सरकारी अनुदानित शाळेच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी ३१ ऑगस्ट या दिवशी इस्लामी कार्यशाळेच्या अंतर्गत वास्को येथील एका मशिदीत ‘मशीद दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु विद्यार्थ्यांनी मशिदीत दिलेल्या सूचनेवरून तेथे नमाजपठण केले आणि विद्यार्थिनींनी मशिदीत अंगावरील गणवेशाची ओढणी हिजाबप्रमाणे परिधान केली. हा उपक्रम गुपित ठेवण्यात आला; मात्र विद्यार्थ्यांची मशिदीतील छायाचित्रे सामाजिक माध्यमात झळकू लागल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
११ सप्टेंबर या दिवशी विश्व हिंदु परिषद आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ‘मशिदीत काय शिकवण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांना पाठवले ?’, याविषयी विचारणा करण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाची भेट घेतली.‘मशीद दर्शन’ उपक्रमासाठी शिक्षण खाते, शाळेचे व्यवस्थापकीय मंडळ आणि संबंधित पालक यांची अनुमती घेण्यात आली नव्हती, तसेच हा शाळेच्या अभ्यासक्रमाचाही भाग नव्हता.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय्.’) या बंदी घातलेल्या आंतकवादी संघटनेशी संलग्नित असलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ यांच्या गोवा विभागाच्या आवाहनाने प्रभावित होऊन हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत नमाजपठण करण्यास पाठवणे आणि विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास सक्तीचे करणे, या कारणावरून विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर आणि अन्य २ शिक्षिका यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.

यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने प्राचार्य शंकर गावकर यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश काढला, तसेच शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यालयाची ही मोठी चूक असल्याचे आणि यापुढे अशी चूक होणार नसल्याची ग्वाही हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दिली. संबंधित मशिदीमध्ये बायणा येथील सरकारी विद्यालयातील काही हिंदु विद्यार्थी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी मशिदीच्या व्यवस्थापनाला जाब विचारला जाणार असल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या वेळी सांगितले.

मशिदीत विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद : ‘स्कूल जिहाद’चा प्रकार !

काही मुले मशिदीत जाण्यास सिद्ध नव्हती, तरीही त्यांना पाठवण्यात आले. मशिदीत हिंदु विद्यार्थ्यांना नमाजपठणासंबंधी सर्व धार्मिक कृती करण्यास भाग पाडले. विद्यार्थिनींना हिजाब घालणे सक्तीचे केले, अन्यथा मशिदीत रहाता येणार नाही, असे सांगण्यात आले. वास्तविक मुसलमान महिलांना मशिदीत प्रवेशबंदी असतांना हिंदु आणि काही ख्रिस्ती विद्यार्थिनी यांना मशिदीत प्रवेश कसा दिला ?

मशिदीमध्ये ८ मौलाना होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘इस्लाम’, ‘अल्ला हो अकबर’, ‘मदिना’, ‘नमाजपठण करण्याचे महत्त्व’ आदींविषयी माहिती दिली. या वेळी मौलानांनी हिंदु विद्यार्थ्यांना ‘तुम्ही दगडाच्या देवाला पूजता आणि आम्ही आकाशातील देवाला पूजतो’, असे सांगून हिंदु विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद केला. हा ‘स्कूल जिहाद’ आहे. हिंदु विद्यार्थ्यांना इस्लामकडे आकृष्ट करण्याचे हे एक षड्यंत्र आहे. ‘स्टुडंट्स इस्लामी ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’च्या अशा स्वरूपाचे ‘इस्लामी कार्यशाळा’ गोव्यात अन्य कुठेही होऊ नये, यासाठी सर्वांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे’, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या वेळी केले.

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’च्या आवाहनाने प्रभावित होऊन नियमबाह्यरित्या विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवले !

‘विद्यालयाच्या प्राचार्यांनी ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’च्या आवाहनाने प्रभावित होऊन संघटनेविषयी कोणतीही चौकशी न करता विद्यार्थ्यांना ‘इस्लामी कार्यशाळे’साठी मशिदीत पाठवले. कार्यशाळेसाठी पाठवण्यात आलेले सर्व विद्यार्थी हे १८ वर्षांहून अल्प वयाचे आहेत, तरीही त्यांच्या पालकांना न विचारताच मशिदीत पाठवण्यात आले. नियमानुसार विद्यार्थ्यांना मंदिर, मशीद किंवा चर्च आदी धार्मिक स्थळे बाहेरून दाखवायची असतात आणि बाहेरूनच तात्त्विक माहिती द्यायची येते. मशिदीत नेऊन त्यांच्याकडून नमाज पठणासंबंधी कृती करून घेणे आणि विद्यार्थिनींना हिजाब घालणे बंधनकारक करणे, ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत अधिकाराची पायमल्ली आहे. विद्यालय हे निधर्मी असते’, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • एवढा मोठा प्रकार होऊनही एकही पुरो(अधो)गामी किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? त्यांना या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत नाही कि मुसलमानांच्या मतांसाठी ते या प्रकराकडे दुर्लक्ष करत आहेत !
  • काही अपवाद वगळता स्थानिक वृत्तपत्रांनीही बातमी ठळकपणे प्रसिद्ध केलेली नाही. यातून प्रसारमाध्यमांचीही मानसिकता लक्षात येते !
  • ‘मशीद दर्शन’च्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना आता थेट मशिदीतच नेऊन त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रकार चालू झाला आहे. हिंदूंनो, धर्मांतराच्या या प्रकारापासून सावध रहा !
  • हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !

सविस्तर वृत्त वाचा –

गोवा : दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी मशीद दर्शन कार्यक्रम !
https://sanatanprabhat.org/marathi/718943.html

विद्यालयांतून इस्‍लामीकरण !
संपादकीय
https://sanatanprabhat.org/marathi/719463.html