आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्‍कार घालू !

पिंपळगाव बहुला (जिल्‍हा नाशिक) येथील पंचायत संघटनेच्‍या बैठकीत चेतावणी !

प्रतिकात्मक चित्र

नाशिक – देशाच्‍या २३ राज्‍यांत संघटनेचे जाळे असून सरकार पाडण्‍याची शक्‍ती संघटनेने निर्माण केली आहे. देश आणि राज्‍य यांतील गढूळ राजकारणामुळे निवडणुका होत नाहीत. ८५ टक्‍के लोकप्रतिनिधी सध्‍या घरी बसले आहेत. (असे आहे तर जनतेने लोकप्रतिनिधींना त्‍यांच्‍या कर्तव्‍याची जाणीव करून द्यावी लागेल ! – संपादक)  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्‍याविना सरकार स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका घेणार नाही. त्‍यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यांच्‍यावरच बहिष्‍कार घालावा लागेल, अशी चेतावणी राष्‍ट्रीय नगरसेवक परिषद अन् राष्‍ट्रीय जिल्‍हा पंचायत संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष कैलास गोरे पाटील यांनी येथे दिली. १० सप्‍टेंबर या दिवशी जिल्‍ह्यातील पिंपळगाव बहुला येथे आयोजित राष्‍ट्रीय नगरसेवक परिषद आणि राष्‍ट्रीय जिल्‍हा पंचायत असोसिएशन प्रदेशाध्‍यक्ष पदग्रहण सोहळ्‍यात ते बोलत होते.