परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून तीव्र शारीरिक त्रास सहन करणार्या कै. (श्रीमती) सुनीता दिगंबर सावंत (वय ७५ वर्षे) !
‘वर्ष २०१८ मध्ये आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला होता. तेव्हा माझ्या समवेत माझी आईही (श्रीमती सुनीता दिगंबर सावंत) सत्संगाला आली होती. सत्संगात गुरुदेवांनी आम्हाला सांगितले, ‘‘आईची काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल.’’ तेव्हा माझ्या मनात आले, ‘आईची प्रकृती चांगली आहे आणि आम्हाला तिच्याविषयी कसलीही काळजी वाटत नाही. मग ‘गुरुदेवांनी असे का सांगितले ?’ तेव्हा ‘गुरुदेव आपल्याला पुढे येणार्या कठीण दिवसांविषयी सांगत आहेत’, असे माझे चिंतन झाले नाही. त्यानंतर पुढे आई रुग्णाईत झाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
आज १२.९.२०२३ या दिवशी कै. (श्रीमती) सुनीता सावंत यांचे मासिक श्राद्ध आहे.
१. आईचे आठवड्यातून ३ वेळा ‘डायलिसिस’ करावे लागणे
वर्ष २०१९ मध्ये आईचे आठवड्यातून ३ वेळा ‘डायलिसिस’ (मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया) करावे लागायचे. या प्रक्रियेला ४ घंटे वेळ लागत असे. तिची सहनशक्ती अधिक असल्यामुळे मागील ४ वर्षे हा त्रास तिने आनंदाने सहन केला. ‘डायलिसिस’ करायला ती कधीच कंटाळली नाही.
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘आईची काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल’, या वाक्याची आठवण करून दिल्यावर आईला त्रास सहन करण्याची शक्ती मिळणे
वर्ष २०२२ पासून तिचे त्रास पुष्कळ वाढले. आम्ही भावंडे ‘आपण आईसाठी काय करू शकतो ?’, याचा रात्रंदिवस विचार करत होतो. तेव्हा मला गुरुदेवांच्या, ‘आईची काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल’, या वाक्याची आठवण झाली. आईला त्रास अधिक होऊ लागल्यावर आम्ही प्रत्येक वेळी तिला गुरुदेवांच्या या वाक्याची आठवण करून देत होतो. मी तिला सांगत असे, ‘‘काहीही झाले, तरी गुरुदेवांच्या मुखातील शब्द खोटे होणार नाहीत. ते तुझी काळजी घेत आहेत.’’ तिलाही गुरुदेवांचे ते वाक्य आठवून त्रास सहन करण्यासाठी शक्ती मिळत असे. तिला गुरुदेवांच्या या वाक्याचा आधार वाटायचा. गुरुदेवांवरील अपार श्रद्धेमुळेच आई हे त्रास सहन करून आनंदाने जगू शकली.
३. आईचे वाढलेले शारीरिक त्रास
पुढे पुढे आईचे त्रास पुष्कळ वाढले. तिच्या हाता-पायांची बोटे सुकू लागली. तिच्या शरिरातील नसा संकुचित झाल्या. शरिरातील प्राणवायूचे प्रमाण न्यून झाले. तरीही ‘ती जिवंत होती’, याचे आधुनिक वैद्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले.
४. अनुभूती
४ अ. आईने गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर तिचा नामजप आपोआप चालू होणे : आईला होणार्या त्रासाविषयी मी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘त्यांनी नामजप करायला हवा.’’ तेव्हा आई प्रामाणिकपणे म्हणाली, ‘‘मला असह्य वेदना होत असल्यामुळे माझा नामजप होत नाही.’’ मी तिला गुरुदेवांना प्रार्थना करण्यास सांगितल्यावर तिच्या मनात आपोआप नामजप चालू झाला. याचा तिला फार आनंद झाला. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी कृपा केली’, असे सांगतांना तिला भावाश्रू येत असत.
४ आ. आईला अंथरुणाला खिळून असतांना सद़्गुुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तिच्यासाठी नामजप केल्यानंतर आई उठून चालू लागणे, तेव्हा ‘संतांमध्ये किती सामर्थ्य असते’, याची जाणीव होेणे : तिचे त्रास वाढल्यामुळे आम्हाला ते पहावत नसत. या कठीण प्रसंगात देवाने आमच्याकडून साधना करून घेतली. ‘गुरुदेवांच्या मुखातील शब्द खरे होतील’, या श्रद्धेवर आम्ही सर्व शांतपणे सहन करत होतो. आईला अंथरुणातून हलताही येत नव्हते. आम्ही पुन्हा सद़्गुरु गाडगीळकाकांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी आईसाठी नामजप केल्यावर ती उठून बसली आणि चालूही लागली. ती आम्हाला म्हणाली, ‘‘आता मी ७५ टक्के ठीक आहे.’’ तेव्हा ‘संतांमध्ये किती अफाट सामर्थ्य असते’, याची आम्हाला जाणीव झाली. केवळ ‘संतांचे आशीर्वाद आणि गुरुदेवांवरील श्रद्धा’ यांच्या बळावर आई हे तीव्र त्रास सहन करू शकली.
४ इ. आईची आठवण आल्यावर आम्हा भावंडांना शांतीची अनुभूती येते.
५. आईने ‘जीवनातील कठीण प्रसंगात देवावर श्रद्धा ठेवून संयमाने कसे जगावे’, हे शिकवणे
१३.८.२०२३ या दिवशी गुरुकृपेने आई शांतपणे अनंतात विलीन झाली. मागील वर्षभरात तिने आम्हाला मनाने खंबीर बनवले. ती स्वतः मायेपासून अलिप्त झाली आणि तिने आम्हा भावंडांनाही मायेपासून अलिप्त केले. तिने आम्हाला गुरुदेवांच्या हाती सोपवले आणि ती देवाकडे निघून गेली. तिने ‘जीवनातील कठीण प्रसंगात देवावर श्रद्धा ठेवून संयमाने कसे जगावे ?’, हे आम्हाला शिकवले.
आईनेच आम्हाला साधनेचे बाळकडू पाजले. ही तिने आम्हाला दिलेली अमूल्य भेट आहे. आम्ही साधना करून ईश्वरप्राप्ती केली, तर तीच आई आणि संत यांच्याप्रती खरी कृतज्ञता ठरेल.’
– सौ. भारती बागवे, कॅनडा (१८.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |