परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवी बालकांच्या सत्संगात खाऊ पाठवल्यावर दैवी बालकांनी सांगितलेला खाऊचा भावार्थ आणि साधिकेच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवी बालकांच्या सत्संगात खाऊ पाठवून खाऊविषयीचा अभ्यास करायला सांगणे : ‘४.११.२०२१ या दिवाळीच्या पहिल्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवी बालकांच्या सत्संगात खाऊ पाठवला. प्रत्येकी ३ चकल्या आणि १ लाडू, असा तो खाऊ होता. ‘खाऊ खातांना मनाला काय जाणवते ? खाऊचा भावार्थ काय ? खाऊ खाणे म्हणजे नुसती चव आणि आनंद घेणे नसून त्याच्या पुढचा टप्पा, म्हणजे त्या खाऊचा आपले मन अन् बुद्धी यांवर काय परिणाम होतो ?’, या पार्श्वभूमीवर सर्व दैवी बालके, दैवी युवा साधक, तेथे उपस्थित असलेले युवा साधक अन् अन्य साधक यांनाही अभ्यास करायला सांगण्यात आला.
२. दैवी बालकांनी सांगितलेला खाऊचा अर्थ ! : त्या वेळी दैवी बालकांनी खाऊचा अर्थ छानपणे उलगडून सांगितला. यातूनच त्यांची प्रगल्भता माझ्या लक्षात आली आणि ‘गुरुदेव त्यांना ‘दैवी बालके’ का म्हणतात ?’, हे लक्षात आले. अवघ्या ५ ते १४ वर्षे वयोगटातील दैवी बालकांनी खाऊचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगितला, ‘या ३ चकल्या, म्हणजे आपले सनातनचे ३ गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) असून या प्रत्येक चकलीमध्ये ३ गुरूंची शक्ती तत्त्वरूपाने आलेली आहे, म्हणजेच या चकल्यांच्या माध्यमातून गुरुदेव आम्हाला सेवा करण्यासाठी तिन्ही तत्त्वांची शक्ती आणि चेतना देत आहेत. जेव्हा गुरुदेवांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे व्यापक ध्येय आणि साधकांचे व्यष्टी साधनेचे ईश्वरप्राप्तीचे ध्येय पूर्णत्वास जाईल, तेव्हा त्यांना आनंदस्वरूप लाडू मिळेल. हा लाडू हे आनंदाचे प्रतीक आहे.’
३. वरील प्रसंगात ‘श्री गजानन महाराज यांनी लोकमान्य टिळकांना प्रसादाची भाकरी पाठवून त्यांच्याकडून ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची निर्मिती करणे’, या कथेची आठवण येणे : या प्रसंगी मला श्री गजानन महाराजांच्या पोथीमधील लोकमान्य टिळकांच्या संदर्भातील एका कथेची प्रकर्षाने आठवण आली. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ या वृत्तपत्रातील वक्तव्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना मंडाले येथील कारागृहात बंदी केले होते. त्या वेळी श्री गजानन महाराजांनी त्यांना प्रसाद म्हणून आपल्या ताटातील भाकरी पाठवली होती. लोकमान्य टिळकांनी ती अतिशय श्रद्धापूर्वक भक्षण केली. त्यामुळे कारागृहात असतांना त्यांच्या हातून ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची निर्मिती झाली.
ही कथा आठवल्यावर मला वाटले, ‘पुढे गुरुदेवांना दैवी बालके आणि युवा साधक यांच्याकडून अलौकिक अध्यात्मप्रसाराचे कार्य करून घ्यायचे आहे. त्यांना ज्ञानशक्तीचा प्रसार करायचा आहे; म्हणूनच या ३ चकल्या आणि एक लाडू देण्याचे प्रयोजन गुरुदेवांनी केले असावे.’
हा अर्थ उलगडून सांगण्याची माझ्यात क्षमता नाही. ‘गुरुदेवांनीच अर्थ सांगून तो माझ्याकडून लिहून घेतला’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ठाणे. (८.११.२०२१)