शारीरिक त्रासांवर सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सांगत असलेल्या नामजपाचे लक्षात आलेले महत्त्व !
‘हे गुरुमाऊली, शारीरिक त्रासावर एकच औषध आणि उपाय, म्हणजे सद़्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप करणे. ‘हे मी प्रत्यक्षात कसे अनुभवले ?’, हे येथे दिले आहे.
१. आधुनिक वैद्यांनी दोन्ही गुडघ्यांचे शस्त्रकर्म करण्याविना पर्याय नसल्याचे सांगणे आणि एका गुडघ्याचे शस्त्रकर्म करणे
माझे दोन्ही गुडघे १० ते १२ वर्षे दुखत होते. मला ठाण्याच्या हाडाचे तज्ञ असलेल्या वैद्यांनी सांगितले, ‘‘दोन्ही गुडघ्यांचे शस्त्रकर्म करायला पाहिजे. पुष्कळ झीज झाली आहे. दुसरा पर्याय नाही.’’
मी ४ वर्षे तशीच काढली. सतत माझे गुरुस्मरण चालू असायचे. गोव्यातील वैद्यांनी मला शस्त्रकर्म हाच पर्याय सांगितला. माझे वय आणि वजनही अधिक असल्याने वैद्यांनी सांगितले की, ‘दोन्ही गुडघ्यांचे एका वेळी न करता १ – २ मासांच्या अंतराने दुसर्या गुडघ्याचे शस्त्रकर्म करूया. उजव्या गुडघ्याचे शस्त्रकर्म केले. आता मला नीट चालता येते. वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसर्या गुडघ्याचे शस्त्रकर्म करण्याची माझ्या मनाची सिद्धता होत नव्हती; कारण पहिल्या गुडघ्याच्या शस्त्रकर्मातून नीट चालता यायला मला २ मास लागले. आता पुन्हा त्याच सर्व स्थितीतून जायची मनाची सिद्धता नव्हती.
२. त्रास असह्य होऊ लागल्यावर सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर त्रास पूर्णतः न्यून होणे
शेवटी मी माझी मुलगी, सौ. मनीषा पानसरे हिला म्हटले, ‘‘तू सांगशील, ते मी करायला सिद्ध आहे.’’ तेव्हा सौ. मनीषाने शारीरिक त्रास न्यून होण्यासाठी सद़्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांना नामजप विचारला. त्यांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । श्री हनुमते नमः ।’, हा नामजप प्रतिदिन १ घंटा करायला सांगितला. तो नामजप मी नियमित करू लागले. ८ दिवसांत माझा त्रास थोडा न्यून झाला. काही दिवसांनी जो गुडघा दुखत होता, त्याचे दुखणे पूर्णतः न्यून झाले. त्या वेळी मला वाटले की, ‘नामजपात किती शक्ती आहे !
मी गोळी न घेता माझा गुडघा बरा झाला आहे, असा मला देवाने दिलेला नामजपरूपी मेवा आहे.’ मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’
– सौ. लक्ष्मी जाधव (वय ७३ वर्षे), फोंडा, गोवा. (१५.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |