सातारा शहराच्‍या विस्‍तारित भागासाठी ७०० पथदीप प्रस्‍तावित !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ११ सप्‍टेंबर (वार्ता.) – नागरिकांना पायाभूत सुविधा देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून शहराच्‍या विस्‍तारित भागासाठी ७०० पथदीप नवीन खांबांसह बसवण्‍यात येणार आहेत. यासाठी सातारा नगरपालिकेने २ कोटी ४८ लाख रुपयांचा प्रस्‍ताव सिद्ध केला आहे.

गत अनेक वर्षांच्‍या मागणीनंतर सातारा नगरपालिकेची सीमावाढ झाली आहे. त्‍यामध्‍ये शाहूपुरी, विलासपूर या ग्रामपंचायती, पिरवाडी, शाहूनगर ही उपनगरे आणि त्रिशंकू भाग समाविष्‍ट झाला आहे. त्‍यामुळे या भागातील नागरिकांना सातारा नगरपालिकेच्‍या वतीने सोयीसुविधा पुरवण्‍यात येऊ लागल्‍या. यासाठी बांधकाम, आरोग्‍य, पाणीपुरवठा आणि विद्युत् विभाग कार्यरत झाला. सीमावाढ होण्‍यापूर्वी नागरी सुविधा स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांकडून पुरवल्‍या जात होत्‍या. त्‍या आता नगरपालिकेने पुरवायच्‍या आहेत. नगरपालिकेच्‍या वतीने करप्रणाली लागू झाली असली, तरी नागरी सुविधांची मात्र वानवा दिसून येते. ‘पाणीपुरवठा, आरोग्‍य विभाग, विद्युत् विभाग यांच्‍याकडून सीमावाढ भागात दुर्लक्ष केले जात आहे’, असे नागरिकांचे म्‍हणणे आहे. अनेक भागांत अद्याप पथदीप नसल्‍यामुळे महिलांची सुरक्षा, भटक्‍या कुत्र्यांची समस्‍या ही सूत्रे ऐरणीवर आली आहेत. यासाठी नगरपालिकेच्‍या विद्युत् विभागाने २ कोटी ४८ लाख रुपयांचा प्रस्‍ताव सिद्ध करून विलासपूर, शाहूनगर या ठिकाणांसह त्रिशंकू भागात पथदीप बसवण्‍याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रारंभ शाहूपुरीतील तामजाईनगर येथून होणार आहे. आवश्‍यकतेनुसार अंतर पडताळून योग्‍य ठिकाणी हे पथदीप बसवण्‍यात येणार आहेत.