श्री. देवदत्त कुलकर्णी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची ‘अँजिओप्लास्टी’ केल्यानंतरही चेहर्यावर आनंद आणि तेज जाणवणे
‘‘१८.११.२०२२ या दिवशी बाबांना (६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी यांना) हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना बांबोळी (गोवा) येथे रुग्णालयात भरती केले आणि ३०.११.२०२२ या दिवशी ‘व्हिक्टर’ रुग्णालयात त्यांची ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी केले जाणारे एक प्रकारचे शस्त्रकर्म) करण्यात आली. त्या वेळी मला त्यांच्यातील सहनशीलता आणि ऐकण्याची वृत्ती दिसून आली.
श्री. देवदत्त कुलकर्णी यांचा निज श्रावण कृष्ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ८१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी सुश्री (कु.) तृप्ती कुलकर्णी यांना वडिलांच्या शस्त्रकर्माच्या वेळी त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
श्री. देवदत्त कुलकर्णी यांना ८१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !
१. हृदयविकाराचा झटका येऊनही एक मजला चढून जाणे
१८.११.२०२२ या दिवशी बाबांच्या छातीत वेदना होऊ लागल्या; म्हणून एका साधकाच्या साहाय्याने ते एक मजला चढून चिकित्सालयात आले. त्यानंतर त्यांचा ‘ई.सी.जी.’ काढल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळले. तेव्हा त्यांची स्थिती गंभीर असल्याने तातडीने सर्व सुविधा असणारी ‘कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स’ (‘बी.पी.’, ‘ई.सी.जी.’ इत्यादी चाचण्या करू शकणारी आणि आधुनिक वैद्य अन् परिचारिका असणारी) बोलावून त्यांना बांबोळीला नेण्यात आले. तेव्हा बाबांची स्थिती पाहून आधुनिक वैद्यांना आश्चर्य वाटले की, ‘ते एक मजला चढून कसे काय येऊ शकले ?’
२. बांबोळीला रुग्णालयात भरती केल्यावर उपचारांपूर्वी आध्यात्मिक उपाय केल्यामुळे वेदना न्यून होणे
बाबांना हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना बांबोळीला नेऊन त्यांच्यावर उपचार चालू करीपर्यंत साधकांनी त्यांच्यासाठी संतांनी सांगितलेले नामजपादी आध्यात्मिक उपाय केलेे होते. त्यामुळे थोड्याच वेळात बाबांना हृदयात होणार्या वेदना न्यून झाल्या.
३. ‘स्ट्रेचर’वरून झोपून न जाता बसून जाणे
रुग्णालयात गेल्यावर परिचारिका त्यांना चाचण्या करण्यासाठी ‘स्ट्रेचर’ वरून सर्वत्र नेत होत्या. आरंभी थोडा वेळ बाबा ‘स्ट्रेचर’ वर आडवे पडले; पण नंतर बसूनच राहिले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला काही होत नाही. मी बरा आहे.’’ त्याच वेळी अन्य रुग्णांना ‘स्ट्रेचर’वरून झोपवून नेले जात होते.
४. रुग्णालयात ४ दिवस असूनही आश्रमात आल्यावर भोजनकक्षात बसून जेवणे
बाबा ४ दिवस बांबोळीला रुग्णालयात रहायला होते. पाचव्या दिवशी संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून सोडल्यावर आम्ही आश्रमात आलो. त्या वेळी आश्रमात महाप्रसादाची वेळ झाली होती. बाबा ४ दिवस रुग्णालयात असतांना पलंगावरून खालीही न उतरल्याने आणि रुग्णालयातून आश्रमात येईपर्यंत पाऊण घंट्याचा प्रवास झाल्याने ‘त्यांना पुष्कळ थकवा आला असेल’, असे वाटल्याने मी बाबांना सांगितले, ‘‘तुम्ही खोलीत जा. मी जेवण खोलीत आणून देते.’’ त्यांनी त्यास नकार दिला आणि भोजनकक्षातच जेवायला बसले. तेव्हा अनेक साधकांना आश्चर्य वाटले.
५. ‘अँजिओप्लास्टी’साठी ‘व्हिक्टर’ रुग्णालयात भरती करणे
रुग्णालयात भरती होण्याच्या आधी बाबांनी सद़्गुरु गाडगीळकाकांकडून नामजप घेतला होता. तो त्यांनी पूर्ण केला.
६. एक बाजू ९० टक्के आणि दुसरी बाजू ९९ टक्के ‘ब्लॉक’ असणे
बाबांची ‘अँजिओग्राफी’ झाल्यावर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, ‘‘बाबांची एक बाजू ९० टक्के आणि दुसरी बाजू ९९ टक्के ‘ब्लॉक’ आहे. त्यामुळे त्यांना ३ ‘स्टेन्ट’ घालावे लागतील. त्यांची खरेतर ‘बायपास सर्जरी’ करावी लागेल; पण त्यांचे वय पहाता आम्ही तो धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे त्यांची ‘अँजिओप्लास्टी’ करूया.’’ त्यानुसार बाबांची ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली.
७. ‘अँजिओप्लास्टी’च्या वेळी मरणप्राय वेदना होत असतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त होणे
‘अँजिओप्लास्टी’ झाल्यानंतर बाबांना भेटण्याची आम्हाला अनुमती मिळाली. आम्हाला भेटल्यावर प्रथम त्यांनी हात जोडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्या बोलण्यातून आम्हाला कळले की, ‘अँजिओप्लास्टी’च्या वेळी बाबांना पुष्कळ वेदना झाल्या होत्या. बाबा म्हणाले, ‘‘मी मरतो कि काय ?’, असे वाटत होते.’’ एवढ्या वेदना होऊनही त्यांना गुरुदेवांची आठवण आली आणि त्यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
८. आनंदी असणे
साधक बाबांना ‘‘काका, कसे आहात ?’’ असे विचारायचे. तेव्हा बाबा म्हणायचे, ‘‘कसा दिसतो ?’’ तेव्हा साधक म्हणायचे, ‘‘आनंदी दिसता !’’ तेव्हा बाबा म्हणायचे, ‘‘हो. मला काहीच झालेले नाही. मी आनंदात आहे.’’
९. पूर्वी थोडेसे आजारपणही सहन न होणे; परंतु आता ‘अँजिओप्लास्टी’ होऊनही त्रास न देणे
आम्ही घरी असतांना त्यांना क्वचित् कधीतरी सर्दी, खोकला व्हायचा; पण तेसुद्धा त्यांना सहन होत नसे. त्यामुळे ‘आता एवढे मोठे आजारपण ते सहन करतील का ?’, याची मला काळजी वाटत होती. या काळात त्यांनी मला अजिबात त्रास न देता मी त्यांना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. त्यांना खोलीत बसणे आणि जेवणे आवडत नाही; पण माझ्या सांगण्यानुसार ८ दिवस त्यांनी पूर्ण विश्रांती घेतली.
१०. व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू ठेवल्यामुळे चेहर्यावर तेज आल्याचे साधना न करणार्या नातेवाइकालाही जाणवणे
त्या काळात बाबांनी त्यांच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू ठेवल्यामुळे त्यांच्या चेहर्यावर तेज आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून कोणालाही ‘ते इतके रुग्णाईत आहेत’, असे वाटत नव्हते. बाबांची ‘अँजिओप्लास्टी’ झाल्यानंतर आश्रमात आल्यावर त्यांचा भाऊ त्यांना भेटायला आला होता. तो साधना करत नसूनही त्यालाही बाबांच्या चेहर्यावरील चैतन्य वाढल्याचे जाणवले.’
– सुश्री (कु.) तृप्ती कुलकर्णी (श्री. देवदत्त कुलकर्णी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.८.२०२३)
‘साधकाने पूर्णवेळ साधना करणार्या मुलीची काळजी करू नये’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला आश्वस्त करणे‘एकदा मला निरोप आला की, आज तुम्हाला प.पू. डॉक्टरांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभणार आहे. मी त्वरित खोलीत जाऊन माझी वही घेतली आणि त्यांच्या सत्संगाला गेलो. मी प.पू. डॉक्टरांना नमस्कार केल्यानंतर आमच्यामध्ये पुढील संभाषण झाले. प.पू. डॉक्टर : तुमची काठी कुठे आहे ? मी : मी काठी वापरत नाही. मला काठीची आवश्यकता वाटत नाही. प.पू. डॉक्टर : तुमच्या हातात काय आहे ? मी : लिहून घेण्यासाठी वही आहे. त्यानंतर मी त्यांना माझा प्रतिदिनचा दिनक्रम सांगितला. तसेच ‘माझी व्यष्टी साधना आणि सेवा सर्वकाही नियमित होते’, असे सांगितले. मी : मी पहाटे ५.३० वाजता उठतो आणि ४५ मिनिटे न थांबता चालतो. ‘मध्यंतरी तुम्ही मला तृप्तीची काळजी करू नका’, असे सांगितल्यावर मी ‘काळजी करणेे’, या माझ्या स्वभावदोषावर ३ मास स्वयंसूचना घेतल्या. (त्यानंतर मी कु. तृप्तीविषयी सांगण्यापूर्वीच त्यांनी आपोआपच सर्व सांगायला आरंभ केला.) प.पू. डॉक्टर : तुम्ही तृप्तीची अजिबात काळजी करायची नाही. तिच्यामध्ये पहिल्यापेक्षा पुष्कळ पालट आहे. मी : मी तिची काळजी करत नाही. ‘देव तारी त्याला कोण मारी’, अशी मला दोन उदाहरणे माहित आहेत. एक प.पू. दास महाराज आणि दुसरे म्हणजे तृप्तीची आई. (कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)) प.पू. डॉक्टर : आता तृप्ती हे तिसरे उदाहरण आहे. तृप्तीची अजिबात काळजी करायची नाही. तीच पुढे इतरांची काळजी घ्यायला लागेल. तिची प्रगती चांगली चालू आहे आणि ती शीघ्र गतीने पुढे जाणार आहे. एवढेच काय, ती संत होणार आहे ! पुढे ती पू. बिंदाताईंच्या (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या) रांगेत जाऊन बसेल. याला अजून काही वर्षे आहेत; पण ती संत होईल ! तृप्ती व्यवहार आणि माया यांतून सुटणार आहे. या ४ वर्षांत तिने एकटीने स्वतःमध्ये किती पालट घडवून आणला आहे ! पूर्वी केवळ ‘त्रासातून बाहेर येणे’, एवढेच तिचे ध्येय होते; पण आता ‘देवाकडे जाणे’ हेच तिचे ध्येय आहे. मला तुमची काळजी नव्हती. तिचीच काळजी होती; पण तिची काळजी तिनेच दूर केली. अशा प्रकारे परम पूज्य डॉक्टर मला ‘तृप्तीची काळजी करू नका’, असे सतत आश्वस्त करत होते. मलाही कु. तृप्तीची प्रगती ऐकून पुष्कळ आनंद होत होता. असे आमचे जवळ-जवळ अर्धा ते पाऊण घंटा बोलणे चालू होते. प.पू. डॉक्टर : पूर्वीची तृप्ती आणि आताची तृप्ती यांत पुष्कळ पालट झालेला आहे. मी : हो. मलाही तिच्यात पालट जाणवतो. तिच्या वागण्या-बोलण्यात पुष्कळ पालट झाला आहे. ती माझी पुष्कळ काळजीही घेते. प.पू. डॉक्टर : तुमचे कपडे कोण धुतो ? मी : मीच माझे कपडे धुतो. कपडे धुलाई यंत्रामध्ये धुतो. अशा रितीने आमचे संभाषण झाले आणि नंतर त्यांनी मला प्रसाद दिला. शेवटी मी जात असतांना पुन्हा एकदा त्यांनी मला सांगितले, ‘‘तृप्तीची काळजी करायची नाही.’’ प.पू. डॉक्टरांचा मला सत्संग लाभला, त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – श्री. देवदत्त कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |