नागपूर येथे ओबीसी संघटनांच्या आंदोलनास प्रारंभ !
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध !
नागपूर – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशी चेतावणी ओबीसी महासंघाने दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १० सप्टेंबरपासून शहरातील संविधान चौक येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याला प्रारंभ करण्यात आला. सर्वशाखीय कुणबी आणि ओबीसी आंदोलन कृती समितीचे संयोजक पुरुषोत्तम शहाणे पाटील यांनी ही माहिती दिली.
नागपूर येथे सर्व शाखीय कुणबी आणि ओबीसी समाजातर्फे आयोजित बेमुदत धरणे आंदोलनात उपस्थित राहिलो.
मराठा समाजाला सरसकट कुणबींचे प्रमाणपत्र देणे तसेच ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणे या दोन भूमिकांविरोधात आम्ही आंदोलन पुकारले आहे.
जालना येथील श्री मनोज जरांगे पाटील जी… pic.twitter.com/iC6d5SnMi1
— Dr Parinay Fuke (@Parinayfuke) September 10, 2023
ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही; मात्र ओबीसी आणि कुणबी यांच्या आरक्षणातून त्यांना सवलती देऊ नयेत. या समाजाला स्वतंत्रपणे आरक्षणाचा लाभ द्यावा. आमचे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, तर ते सरकारच्या विरोधात आहे. या माध्यमातून आम्ही जनजागरणही करणार आहोत. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांविषयी लेखी हमी देणार नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील. ‘उपोषण आणि अन्नत्याग अशा आंदोलनांच्या माध्यमातूनही विदर्भात आमचा लढा चालू रहाणार आहे’, असे ओबीसी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.