कुणाच्या बापाचे धाडस आहे, जो हिंदु धर्म नष्ट करू शकेल ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री
द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांची जागा दाखवावी लागेल !
अमरावती – देशावर ज्यांनी आक्रमण केले, ते संपले; पण हिंदु धर्म कधी संपला नाही. कुणाच्या बापाचे धाडस आहे, जो हिंदु धर्म नष्ट करू शकेल ! द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन जर हिंदु धर्म संपवण्याची भाषा करत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० सप्टेंबर या दिवशी येथे दिली. येथील खासदार नवनीत राणा यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. हिंदु धर्माला डेंग्यू आणि मलेरिया म्हणणारे उदयनिधी स्टॅलिन यांचे वडील एम्.के. स्टॅलिन यांच्या बाजूला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसतात. ते आता कुणासमवेत आहेत, हे लोकांना कळले आहे. त्यांना आता नक्कीच घरी पाठवावे लागेल.
२. भगवान श्रीकृष्ण हे तर अमरावती जिल्ह्याचे जावई आहेत. त्यांच्या जन्मोत्सवात आम्ही विकास आणि प्रेम यांचा काला घेऊन आलो आहोत. गेल्या ७० वर्षांत जितका निधी अमरावती जिल्ह्याला मिळाला नाही, तेवढा निधी आमच्या सत्ताकाळात मिळाला आहे. येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ विकास, मेगा टेक्सटाईल पार्क, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विद्यापीठ, रिद्धपुरात मराठी भाषा विद्यापीठ, रस्त्यांची २ सहस्र कोटी रुपयांची कामे हा विकासाचा ओघ आहे.
३. या देशात केवळ भगवान श्रीराम, हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज चालतील.
४. ‘भारतमाता की जय’ ! असे म्हणण्यास किती चांगले वाटते ! ‘इंडिया माता’ म्हणणे मनाला चांगले वाटते का ?’ (यावर सभेतील लोकांनी ‘नाही नाही’, असे उत्तर दिले.)