‘आतंकवाद कसा संपवायचा ?’, हे शिकवणारी छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ पुन्हा महाराष्ट्रात येणार !
ब्रिटीश राजवटीत भारतियांच्या स्वराज्याची कल्पना परकीय शक्तींविरुद्ध लढा देणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित होती. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशवासियांना राष्ट्रवादाच्या भावनेसाठी प्रेरित करणारे आदर्श मानले जातात. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय जनतेसाठी वंदनीय आहेत. छत्रपती शिवरायांची तलवार आणि वाघनखे इंग्रजांनी इंग्लडला नेली. ऐतिहासिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, सध्या ही तलवार ‘सेंट जेम्स पॅलेस’मधील ‘रॉयल कलेक्शन’चा भाग आहे आणि वाघनखे इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात आहेत. सध्याचे आंतरराष्ट्रीय कायदे किंवा करार केवळ चोरी किंवा अवैध तस्करी यांद्वारे निर्यात केलेल्या वस्तूंना लागू आहेत. भारताच्या स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्लंडला नेण्यात आलेल्या पुरातन वस्तू परत करण्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यात कोणताही करार नाही. त्यामुळे या वस्तूंचे प्रत्यार्पण करणे शक्य नाही.
१. मराठा शस्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व !
१६ व्या शतकात प्रस्थापित राजकीय व्यवस्थांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पाने शह दिला. छत्रपती शिवरायांच्या काळात महाराष्ट्रापासून चालू झालेले स्वराज्य छत्रपती शाहू यांच्या काळात अटकपर्यंत जाऊन भिडले. या संघर्षात प्रत्येक युद्धागणिक भारताच्या राजकीय पटलावर आणि पर्यायाने युद्ध पटलावर ‘मराठा शस्त्रे’ हा स्वतंत्र वर्ग निर्माण झाला. अल्प उंची, आकारातील सरळपणा (पाती किंवा शस्त्र यांचा आकार फारसा वक्र नसणे), शस्त्रांचे अखंड स्वरूप (जोड न देता सिद्ध केलेली शस्त्रे ), अत्यंत मोजके किंवा अल्प नक्षीकाम, शस्त्र निर्माणकर्त्यांच्या चिन्हांची अथवा शिक्क्यांची सहसा अनुपलब्धता, शस्त्रांवर दिनांकांचा अभाव या वैशिष्ट्यांमुळे ‘मराठा शस्त्रे’ अन्य भारतीय शस्त्रांहून वेगळी ठरली. मराठा शस्त्रांची वैशिष्ट्ये आणि इतिहास आजपर्यंत अभ्यासक अन् सामान्य माणसांपर्यंत मांडला गेलेला नाही. या प्रदर्शनांच्या माध्यमातून ती संधी निश्चितच मिळू शकते.
२. वाघनखे इंग्लंडला कशी गेली ?
वर्ष १८१८ पासून ग्रँड डफ यांची सातारा संस्थानाचा ‘रेसिडेंट’ (निवासी अधिकारी) म्हणून नियुक्ती झाली. वर्ष १८१९ ते १८२२ पर्यंत तो साताराचे राजे प्रतापसिंह यांच्या नावे कारभार पहात होता. त्याने ही वाघनखे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याकडून मिळवली आणि इंग्लडला नेली. ग्रँड डफ याचा नातू किंवा पणतू आँड्रिन डफ याने ती वाघनखे ‘व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट म्युझियम’ला दिली. त्या संग्रहालयात या वाघनखांची ‘Tiger Claws, said to have been possessed by Shivaji’, (वाघाचे पंजे जी शिवाजीच्या ताब्यात असल्याचे म्हटले जाते.) अशी नोंद आहे. ही वाघनखे या वस्तूसंग्रहालयाच्या तळघरातील एका कपाटात ठेवली आहेत. त्यासाठी एक विशेष पेटी आहे. ती पहाण्यासाठी अनुमती आवश्यक आहे. ती उत्कृष्ट पोलादापासून सिद्ध करण्यात आली असून अतिशय प्रमाणबद्ध आहे.
३. अशी आहेत वाघनखे !
एक पट्टी, त्यावर खालच्या बाजूस बसवलेली ४ नखे आणि वरच्या बाजूस अंगठ्या, असे या वाघनखांचे स्वरूप आहे. ही वाघनखे डाव्या हाताची असल्यामुळे त्यातील लहान अंगठी करंगळीत, तर मोठी अंगठी तर्जनीच्या बोटात जाते. ४ नखे ही हाताच्या ४ बोटांच्या बरोबर खाली येतात अगदी वाघाच्या पंजाप्रमाणे. हे सर्वांत लहान आणि सर्वांत प्रतापी गुप्त शस्त्र आहे.
४. महाराष्ट्र शासनाची भूमिका !
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याचे प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून केले जात आहेत. छत्रपती शिवरायांशी संबंधित पुरातन वास्तू आणि वाघनखे परत आणण्याची जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळेत यावर चर्चा झाली आहे आणि महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी या वस्तू मायदेशात परत आणण्याविषयी एकमत व्यक्त केले. इंग्रजांची सत्ता ही आपल्या पुरातन वास्तू, देशाची कला, सांस्कृतिक वारसा यांसाठी घातक ठरली आहे.
५. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार !
जनभावना लक्षात घेऊन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त इंग्लंडमध्ये असलेली वाघनखे परत आणण्याचा संकल्प घोषित केला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ही वाघनखे भारतात परत आणण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा केला अन् त्याला आता मूर्त स्वरूप येत आहे.
६. इंग्लंडशी झालेला पत्रव्यवहार !
याविषयी भारत आणि इंग्लंड या देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी १५ एप्रिल २०२३ या दिवशी मुंबईतील ओबेरॉय हॉटेल येथे पश्चिम भारताचे उपउच्चायुक्त ॲलेन गॅमेल, राजकीय आणि द्विपक्षीय व्यवहार उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’शी पत्रव्यवहार केला. त्यानंतर ही वाघनखे ‘३ वर्षांच्या मुदतीने कर्ज म्हणून’ प्रदर्शनासाठी देण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत भारताचा सांस्कृतिक कार्य विभाग, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री, ब्रिटनचे सांस्कृतिक कार्यमंत्री, लंडनमधील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे संचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
७. सामंजस्य करारासाठी शिष्टमंडळ इंग्लंडला जाणार !
जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याचा सामंजस्य करार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ ग्रेट ब्रिटन येथे जाणार आहे. ३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी याविषयी ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ येथे बैठक होणार आहे.
८. वाघनखे सर्वसामान्यांना पहाता येणार !
हिंदवी स्वराज्याची निर्मिती करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक स्वतंत्र युद्धनीती वापरली. या युद्धनीतीमध्ये वापरली गेलेली शस्त्रेही या युद्धनीती इतकीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘वाघनखे’ ही त्यातीलच एक शस्त्र आहे. वाघनखे इंग्लंडमध्ये असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला ती पहाता येणे दुरापास्त होते. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही वाघनखे पुढील काळात पुरातत्त्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाच्या वस्तूसंग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.
९. शिवशस्त्रांपासून स्फूर्ती घेऊन देशप्रेम वाढवा !
‘स्वराज्याच्या कामी आलेली वाघनखे आणि मराठाकालीन शस्त्रे यांच्या प्रदर्शनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. या शिवशस्त्रगाथेपासून स्फूर्ती घेऊन देशप्रेमाची भावना वाढीस लागेल, असे आचरण करावे’, असे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे.
१०. भारतात वाघनखे आल्यानंतरचा कार्यक्रम !
३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, लंडन’ अन् ‘पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन’ यांच्यात वाघनखांविषयीचा ‘सामंजस्य करार’ करण्यात येऊन त्यावर संबंधितांची स्वाक्षरी होईल. यानंतर वाघनखांविषयी विमा काढण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल आणि १५ नोव्हेंबर २०२३ या दिवशी वाघनखे हस्तांतरित केली जातील. १६ नोव्हेंबर २०२३ या दिवशी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे आगमन होईल. १७ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयास रवाना करून त्यांची स्थापना करण्यात येतील. यानंतर १५ ऑगस्ट २०२४ या दिवशी ही वाघनखे नागपूर येथे आणि १५ एप्रिल २०२५ या दिवशी कोल्हापूर येथे शासकीय वस्तूसंग्रहालयात, तर १५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय येथे ठेवण्यात येणार आहेत. १६ नोव्हेंबर २०२६ या दिवशी वाघनखे पुन्हा ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, लंडन’ यांना पाठवण्यात येतील.
(साभार : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र आणि पुरातन अन् वस्तूसंग्रहालय संचालनालय, मुंबई)