गोमंतकियांची श्री गणेशचतुर्थीची आगळीवेगळी परंपरा !

कुळंबी, धनगर आणि गोसावी या ३ जमाती सोडल्यास गोव्यातील प्रत्येक घरात श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा केला जातो. याला ‘चवथ’ असे म्हणतात. एखाद्या मोठ्या कुटुंबातून काही माणसे विभक्त होऊन त्यांनी दुसरे घर बांधल्यास तेथे पहिल्यांदा स्वत: श्री गणेशमूर्ती आणून पुजायचा नाही, तर कुणीतरी शेजारी श्री गणपतीची मूर्ती त्या दिवशी सकाळच्या प्रहरी आणून घराच्या सोप्यावर ठेवतो आणि फटाके पेटवून निघून जातो. अशी कुणी श्री गणपतीची मूर्ती आणून ठेवली, तरच घरात त्याची प्रतिष्ठापना आणि पूजा करावयाची असते. आपणहून इच्छा असली, तरी स्वत: आणून पहिला गणपति पुजला जात नाही.

१. पारंपरिक सुशोभीकरण

पूर्वी मातीच्या जमिनी असल्याने घरातील दर्शनी भागात असलेली ओसरी वा खोली शेणाने सारवली जायची आणि एखादे लाकडी मखर करून अगर नुसत्याच टेबलावर वा फळ्यांचा, कामट्याचा, पोफळीच्या कांबीचा मचाणासारखा उंचवटा करून तेथे गणपतीची मातीची मूर्ती आणून ठेवली जायची. मखराच्या वरच्या छताला बांबूच्या कामट्या उलट्यासुलट्या बांधून एक चौकट बांधतात. या चौकटीला आंब्याच्या डहाळ्या आणि नारळाची पेंड, केळ्यांचा घड आणि अन्य बागेतील रानटी फळफळावळ बांधली जाते. याला ‘माटोळी’ म्हणतात.

प्रत्येक गावात मूर्तीकार असतात. तेथे काही रक्कम आणि एक नारळ देऊन घरातून नेलेल्या पाटावर मूर्ती ठेवून, किमान कागदाने झाकून डोक्यावरून ही मूर्ती घरी आणायची. मूर्ती घराच्या दरवाज्यापाशी येताच तिचे औक्षण करणे, तसेच पाण्यात कुंकू कालवून मूर्तीभोवती तीनदा ओवाळून ते पाणी बाजूला टाकायचे. हे काम घरधनीण अथवा अन्य सुवासिनींकडून होते. मग मूर्तीची पूजा होते. ही पूजा काही घरांतून ब्राह्मणाविना होते. दुपारी आणि रात्री आरत्या होतात. या आरत्या घुमट-समेळ या वाद्यसाथीने जोरदार आणि खूप वेळ चालणार्‍या असतात. सायंकाळी महिला गणपतीसमोर फुगडी घालतात. पंचमीच्या दुपारी गणपतीसमोर केळीच्या गाभ्याचे मखर, किमान पाच गाभे लावून केले जाते. पंचमीच्या रात्री गणपति पोचवयाचा. हे सारे परंपरेनुसार चालते.

२. खाद्यपदार्थांचे खास वैशिष्ट्य

श्री गणेशचतुर्थीच्या सणाला खाद्यपदार्थांचे खास वैशिष्ट्य आहे. गणपतीच्या नैवेद्याला मोदक आणि लाडू याबरोबरच खोबर्‍याचे पुरण भरलेल्या करंज्या आवश्यक आहेत. गणपतीसमवेत उंदीर या श्री गणेशाच्या वाहनाला स्वतंत्रपणे नैवेद्य दाखवला जातो. गौरीसाठी खीर हवी असते. दुसर्‍या म्हणजे पंचमीच्या दिवशी ‘पातोळ्या’ या पदार्थाचा नैवेद्य आवश्यक आहे. (पातोळ्या म्हणजे हळदीच्या पानावर तांदळाची उकड पसरवून त्यात सारण भरून ते पान उभे दुमडायचे आणि तो पदार्थ उकडायचा. – संकलक) पंचखाद्य हा प्रकारही हवा असतो. श्री गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी माटोळीला बांधलेले एक तरी फळ काढून त्याचा नैवेद्य दाखवतात.

३. नवधान्य दरवाज्यावर बांधणे

बहुतेक ठिकाणी या पंचमीलाच नवधान्य, म्हणजे कणसे असलेल्या भाताच्या लोंब्या शेतातून परंपरेने ठरलेला माणूस घेऊन येतो. हे नवधान्य पाटावर ठेवले जाते आणि ते घेऊन येणार्‍या माणसाला एक नारळ दिला जातो. या नवधान्याची पूजा होते. त्यातील काही दाणे त्या दिवशीचे अन्न शिजवतांना त्यात टाकले जातात. मागाहून त्या लोंब्या विशिष्ट पद्धतीने बांबूच्या कामट्यात बांधून घरातील प्रमुख दरवाज्यावर बांधल्या जातात. तोरणासारख्या बांधलेल्या या लोंब्या पुढच्या वर्षी नवीन लोंब्या आल्यानंतरच काढल्या जातात. नवधान्याची ही प्रथा अनेक ठिकाणी श्रावण पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा यामध्ये कधीतरी होते.

४. विसर्जनाची परंपरा

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पाणवठ्यावर उदा. समुद्र, तलाव, नदी, विहीर जे असेल तेथे जातांना पाटावर श्री गणेशमूर्ती ठेवायची, तेथे एक पेटवलेला दिवा ठेवायचा, गणपतीवर लाह्या घालायच्या आणि तो पाट डोक्यावर घेऊन चालायचे. पाण्याकडे पोचल्यानंतर पाट खाली ठेवून नारळ फोडायचा आणि नारळातील थोडे पाणी अन् थोडे खोबरे मूर्तीच्या अंगावर टाकावयाचे आणि मगच मूर्ती पाण्यात विसर्जन करायची, असे पारंपरिक विधी आहेत.

५. गणपतीला नवस बोलणे

घरातील गणपति सर्वत्र दीड दिवसाचा असतो. नवस असला, तरच ५, ७ किंवा ९ दिवस असतो. लोकजीवनात आणखी एक नवस म्हणजे अमूक काम झाले, तर लाडवांचे, मोदकांचे पेड बांधणे हा आहे. मूर्तीच्या भोवती हे लाडू पारासारखे मांडले जातात. मुलगा होत नसल्यास नवस करतात की, ‘मूल झाल्यानंतर त्याला माटोळीला बांधेन’ असा. मग त्या अर्भकाला कापडात गुंडाळून काही काळ वर माटोळीला बांधून ठेवायचे आणि देवाला गार्‍हाणे घालायचे. श्री गणेशमूर्ती िवसर्जनानंतरचा दुसरा दिवस अशुभ मानला जातो. त्या दिवशी गावाबाहेर जात नाहीत.
संपूर्ण गोव्यात हा उत्सव असाच होतो. यात अन्य विधी कोणतेही नाहीत. सामान्य गोमंतकियाला या चवथीचे विलक्षण आकर्षण आहे. लोकजीवन आणि शिष्ट जीवनात श्री गणेशचतुर्थी हा उत्सव सारख्याच आनंदाने अन् उत्साहाने होतो.

(संदर्भ : लोकसरिता – गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, लेखक – श्री. विनायक विष्णु खेडेकर)   ॐ


काणकोण तालुक्यातील तुडल गावची अनोखी प्रथा ‘खुंटी जोगवणे’

श्री गणेशचतुर्थीच्याच संदर्भात एका वेगळ्या प्रकारची नोंद करणे आवश्यक आहे. काणकोण तालुक्यात ‘तुडल’ नावाचे गाव आहे. तेथे मराठा देसाईंची काही कुटुंबे आहेत; परंतु तेथे तिसर्‍या दिवशी गणपति पोचवतात. दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचमीच्या दिवशी काही गंभीर विधी असतात. त्याला ‘खुंटी जोगवणे’, असे म्हणतात. या दिवशी जलम्याच्या हस्ते कोंबडा कापायचा आणि घरातल्या प्रत्येक पुरुषाने एक मातीचा गाडगा अन् शिसम लाकडाच्या काही कामट्या घेऊन परंपरागत वहाळावर जायचे. तेथे प्रत्येक पुरुषाच्या नावे एकेक चूल आहे. मुलगा जन्माला आला की, त्याच्या नावे चूल तयार करावयाची. मूल लहान असेल, तर पुढील विधी पिता अगर दुसरा माणूस करतो. मग त्या गाडग्यात पाणी घालून, आपल्याच चुलीवर शिसमाच्या त्या कामट्या जाळून भात शिजवायचा आणि नंतर तो भात करमलाच्या झाडाच्या पानावर ठेवायचा अन् मागे न बघता घरी येऊन झोपायचे. घरातून निघाल्यापासून येईपर्यंत तेथे संपूर्ण मौन पाळणे, कुणी कोणाशी त्या रात्री बोलायचे नाही. चूल बदलली अथवा अन्य काही चूक झाल्यास वर्ष वाईट जाते ही समजूत. त्या रात्री गणपतीला आरती आणि नैवेद्य नाही. तिसर्‍या दिवशी गणपति पोचवला जातो. त्या वहाळाच्या काठावर परंपरेच्या अनेक चुली उभ्या आहेत.

(संदर्भ : लोकसरिता – गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, लेखक – श्री. विनायक विष्णु खेडेकर)     ॐ