भारतातील महान ऋषि परंपरा

वाचा नवे सदर !

चंद्रयान आणि सौरयान यांचे अवकाशात थेट प्रक्षेपण झाल्यानंतर काही दिवसांनी ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ यांचा एक जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला. त्यात त्यांनी ‘भारतीय वेदांमधील ज्ञानाच्या आधारे आधुनिक विज्ञान प्रगती करू शकते’, आदी सांगून वेदांचे कौतुक केले आहे. या वेदांतील ज्ञानाचा प्रसार करणारे थोर ऋषि मुनी, त्यांची परंपरा, कार्य, त्यांनी केलेले संशोधन आणि शिकवण यांची माहिती आजच्या समाजाला अत्यल्प आहे. २० सप्टेंबर या दिवशी असलेल्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून या सदराच्या माध्यमातून थोर ऋषींविषयीची अमूल्य माहिती वाचकांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या सदरातील प्रथम लेखात ऋषींचे कार्य आणि वेदकाळातील त्यांचे जीवन यांची माहिती जाणून घेऊया.

‘भारतातील ऋषि परंपरा इतकी पुरातन आहे की, वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. आजही भारतीय मनात ऋषि पदाविषयी नितांत आदर आहे. आधुनिक काळातही अनेक ऋषि होऊन गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल.

१. ऋषींचे कार्य

ऋषि परंपरेच्या पोटात ‘सप्तर्षी’ ही संस्था दडलेली आहे. भारतीय परंपरेनुसार आतापर्यंत १४ मन्वंतरे झाली असून प्रत्येक मन्वंतराच्या प्रारंभी ७ ऋषि अवतीर्ण होतात. ते ‘प्रजोत्पादन’ आणि ‘धर्मस्थापना’ हे कार्य चालू करतात. त्यांच्या प्रेरणेने आणि पुरुषार्थाने हे कार्य मन्वंतर अंतापर्यंत चालू रहाते; मात्र प्रत्येक मन्वंतरारंभी भिन्न भिन्न सप्तर्षींचा समूह असतो. त्रिकालदर्शी अशा विद्या, तप संपन्न ऋषींकडे मुख्यतः २ भूमिका येतात. एक म्हणजे ‘प्रजा विस्तार’ आणि दुसरी म्हणजे ‘ज्ञानसंप्रदायाचे प्रवर्तन करणे’ ! या विविध कार्यांमुळे ऋषींचे पुष्कळ प्रकार निर्माण झाले आहेत. ऋषिवर्गाची सततची ज्ञानसाधना आणि तपश्चर्या यांमुळे या देशात शिक्षादी ६ वेदांगे, न्यायवैशेषिक इत्यादी ६ शास्त्रे, आयुर्वेद, धनुर्वेद, संगीतशास्त्र, वास्तूशास्त्र, स्मृती, कारिका, धर्मसूत्रे, पुराणे, इतिहास, भाष्ये, वार्तिके इत्यादी सर्व ज्ञानभांडार निर्माण झाले.

२. उच्च दर्जाचे भौतिक समृद्धीचे जीवन देणार्‍या वैदिक काळातील ऋषि !

वैदिक काळातील ऋषी हे गृहस्थ, प्रपंचात रस घेणारे, देवाची आराधना करणारे, राजकीय आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे, यज्ञ करणारे, कौटुंबिक सुख अन् पुत्रपौत्र यांची कामना करणारेही होते. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी लढाई आणि समाजधारणेसाठी राजकारण यांचे त्यांना वावडे नव्हते. वसिष्ठ हे उत्तम घोडेस्वार, तर विश्वामित्र हे उत्तम लढवय्ये होते. या ऋषिपरंपरेचा परिणाम म्हणून की काय, वेदकाळात सर्वसामान्य जनता अतिशय उच्च दर्जाचे भौतिक समृद्धीचे जीवन जगत होती.

२ अ. ऋषींच्या मते, हे जग म्हणजे सद्गुणी लोकांसाठी चांगले जीवन जगण्याचे योग्य ठिकाण होते आणि या कामात त्यांना परमेश्वराचे साहाय्य नेहमीच मिळू शकत असे. वेदांच्या तत्त्वज्ञानात कुठेही निराशावाद नाही. दैववाद किंवा दुष्टता यांचा फार अल्प उल्लेख आहे. मुख्य म्हणजे वेदकाळात नरकाची कल्पना नव्हती. ऋग्वेद काळातील तत्त्वज्ञानात ‘सद्गुणी लोकांचे मृत्यूनंतरचे जीवन कसे उज्ज्वल असेल ?’ यावर भर आहे.

२ आ. मानवाचे भूतलावरील अस्तित्व हा त्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गातील एक टप्पा आहे, अशी सर्वसाधारण मान्यता होती. परिणामतः माणसाचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये संघर्ष नव्हता. धर्म, अर्थ आणि काम हे तीनही पुरुषार्थ गुण्यागोविंदाने नांदत होते. भूतलावरील मानवी जीवन आणि स्वर्गातील त्याचे जीवन यांत अखंडता होती.

३. दुर्जनांच्या दौर्जन्याचा प्रतिवाद करणे हा ऋषींचा बाणा, तर तप आणि पराक्रम ही ऐश्वर्याची साधने !

तत्कालीन ऋषींच्या योगदानाचे मनोज्ञ चित्रण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पुढील शब्दांत केले आहे. ‘‘वैदिक ऋषींत जयष्णू (विजयी) समाजाच्या सर्व तर्‍हेच्या महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित झाल्या आहेत. दुर्जनांच्या दौर्जन्याचा प्रतिवाद करण्याचा ऋषींचा बाणा आहे. तप आणि पराक्रम ही ऐश्वर्याची साधने आहेत. ऋषींच्या हृदयात उत्साह आणि प्रयत्न यांची वाण नाही. वैदिक वाङ्मय आशावादाने फुलून गेले आहे. वैदिक वाङ्मयातील आशावादाच्या पाठीमागे सत्कर्म, सामर्थ्य, सत्य, ज्ञान आणि तप यांचे अधिष्ठान आहे. शुद्ध सौंदर्याचा ऋषींना वीट नाही. आध्यात्मिक आनंद आणि आधिभौतिक आनंद यांचे भौतिक वैदिक वाङ्मयात संगनमत झाले. प्रपंच आणि परमार्थ गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत.’’

– श्री. अ.ल. देशपांडे, वॉर्ड नं. १ भागचंद नगर, धामणगाव रेल्वे (संदर्भ : भारतीय संस्कृतीतील ऋषिपरंपरा , डिसेंबर १९९६)