मुख्यमंत्री इंग्लंडला जाऊन ‘वाघनखे प्रत्यार्पण’ करारावर स्वाक्षरी करणार !
मुंबई – इंग्रजांनी भारतातून नेलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘वाघनखे’ भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे २९ सप्टेंबर या दिवशी इंग्लंडला जाणार आहेत. तेथे ३ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री वाघनखांच्या प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी करणार आहेत. याच वाघनखांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्याशी दगाफटका करणार्या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.
अफजल खानाचा कोथळा काढणारी वाघनखे शिवप्रताप दिनाच्या औचित्याने भारतात परतणार..!@PMOIndia @GOVUK #ReturnOfTigerClaw pic.twitter.com/GLnUcxLfAt
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 9, 2023
या शिष्टमंडळात सांस्कृतिक कार्यविभागाचे प्रधान सचिव आणि पुरातत्व अन् वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक हेही असणार आहेत. ज्या ठिकाणी ही वाघनखे आहेत, त्या लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’चे संचालक ट्रायस्ट्रॅम हंट यांच्यासमवेत भारतीय शिष्टमंडळाची भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता बैठक होणार आहे. २ ऑक्टोबर या दिवशी लंडन येथील सेंट जेम्सेस पॅलेसला हे शिष्टमंडळ भेट देणार आहेत. हे शिष्टमंडळ ४ ऑक्टोबरपर्यंत इंग्लंड येथे असणार आहे.