मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती प्रदर्शनाला शेकडो भाविकांची भेट !
श्री गणेश कला केंद्राच्या शाडूच्या मातीच्या मूर्तींकडे भाविक आकृष्ट !
मुंबई, १० सप्टेंबर (वार्ता.) – मंत्रालयामध्ये ५ आणि ६ सप्टेंबर या दिवशी राज्यशासनाच्या पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रदर्शन २०२३’ आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये पनवेल येथील श्री गणेश कला केंद्राच्या सात्त्विक शाडूच्या मातीच्या मूर्तींकडे भाविक सर्वाधिक आकृष्ट झाले. सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कलाप्रेमी आदींनी श्री गणेश कला केंद्राला भेट देऊन श्री गणेशमूर्तींसाठी मागणी नोंदवली.
भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरि झिरवळ, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
श्री गणेश कला केंद्राने बनवलेल्या मूर्ती खर्या अर्थाने पर्यावरणपूरक ! – प्रमोद बेंद्रे
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना श्री गणेश कला केंद्राचे श्री. प्रमोद बेंद्रे म्हणाले की, या प्रदर्शनाला ४-५ सहस्र लोकांनी भेट दिली. या मूर्ती संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि अथर्वशीर्षातील श्री गणेशाच्या वर्णनानुसार सिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मूर्तीमध्ये श्री गणेशाचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. या मूर्तींसाठी शाडूची माती आणि नैसर्गिक रंग यांचा उपयोग करण्यात आला आहे. श्री गणेशाचा नामजप करत या मूर्ती सिद्ध करण्यात आल्या आहेत. या मूर्ती खर्या अर्थाने पर्यावरणपूरक आहेत.