सहनशील आणि रुग्णाईत असतांनाही देवाच्या अनुसंधानात असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले राख (तालुका पुरंदर), जिल्हा पुणे येथील कै. वसंत किसन गायकवाड (वय ७४ वर्षे) !
‘२.९.२०२३ या दिवशी मु.पो. राख, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील वसंत किसन गायकवाड यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. ११.९.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्यानिमित्त देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करणारी त्यांची मुलगी सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३३ वर्षे) आणि जावई श्री. नारायण पाटील यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. वडिलांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर आधुनिक वैद्यांनी ‘तुमचे वडील तुम्हाला बाहेरून चांगले दिसत असले, तरीही त्यांची शारीरिक स्थिती पुष्कळ बिकट आहे’, असे सांगणे : ‘मागील १५ दिवसांपासून बाबांना दम्याचा तीव्र त्रास होत असल्याने श्वास घ्यायला पुष्कळ त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती केले होते. बाबांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर लक्षात आले की, ‘त्यांचे फुप्फुस रबरासारखे घट्ट झाले आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाले आहे आणि त्यांचा रक्तदाब (ब्लडप्रेशर) वाढला आहे आणि त्यांना ‘न्यूमोनिया’ही झाला आहे. त्यांच्या रक्तातील ‘कार्बन डाय-ऑक्साइड’चे प्रमाण अधिक आणि ऑक्सिजनचे प्रमाण अल्प झाले आहे.’ तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमचे वडील तुम्हाला बाहेरून चांगले दिसत असले, तरीही त्यांची शारीरिक स्थिती पुष्कळ बिकट आहे.’’
२. सहनशील : ‘बाबांना एवढे शारीरिक त्रास आहेत’, असे समजल्यावर आम्हाला वाटले, ‘बाबांकडे पाहून आम्हाला त्यांच्या आजारपणाविषयी कधीच कळले नाही आणि बाबांनी ते कधी जाणवूही दिले नाही.’
३. तीव्र शारीरिक त्रास असतांनाही न थकता पत्नीची सेवा करणे : बाबांना तीव्र शारीरिक त्रास होत असूनही ते आईची (त्यांच्या पत्नी सौ. नर्मदा यांची) सेवा न थकता करत होते. आईला अंघोळ घालणे, तिला कपडे घालायला साहाय्य करणे, तिला जेवण देणे इत्यादी. (आईला मागील ४० वर्षांपासून संधीवात आहे. हा त्रास वाढत गेल्यामुळे १२ वर्षांपासून ती अंथरुणाला खिळून आहे. बाबा तिची सर्व सेवा करत असत.)
४. वडील रुग्णालयात असतांना जाणवलेली सूत्रे
४ अ. आम्ही बाबांना भेटायला रुग्णालयात गेलो असतांना आमच्या लक्षात आले, ‘त्यांना तीव्र त्रास होत आहे, तरीही त्यांचा चेहरा पाहून तसे जराही जाणवत नाही.’
४ आ. देवाच्या अनुसंधानात असणे
१. त्यांच्या तोंडात सतत देवाचे नाव होते. ते सतत साधनेविषयीच बोलत होते. आम्ही त्यांना जो नामजप करायला सांगू, तो ते सतत मोठ्या आवाजात करत होते.
२. आम्ही त्यांना भ्रमणभाषमधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवून विचारले, ‘‘हे कोण आहेत ?’’ तेव्हा त्यांची लगेच सांगितले, ‘‘हे आठवले महाराज आहेत.’’ बाबा नंतर नामजप करू लागले.’
– सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३३ वर्षे) (कै. गायकवाड यांची धाकटी मुलगी) आणि श्री. नारायण पाटील (कै. गायकवाड यांचे धाकटे जावई), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
४ इ. रुग्णालयात सौ. लक्ष्मी यांचे त्यांच्या वडिलांशी साधनेविषयी झालेले संभाषण
४ इ १. वडिलांनी आयुष्यभर निष्काम कर्म केले असणे : ‘एकदा आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.
मी : अप्पा, (आम्ही बाबांना ‘अप्पा’ असे संबोधत होतो.) श्रीरामाला, देवाला सांगा, ‘माझी साधना करून घ्या.’ (वडिलांची श्रीरामावर पुष्कळ श्रद्धा होती.)
अप्पा (प्रार्थना करून) : मला साधना करायची आहे.
मी : कोणती साधना करायची आहे ?
अप्पा : मला सनातन संस्थेने सांगितलेली साधना करायची आहे.
मी : तुम्ही काय साधना करता ?
अप्पा : कर्म करत रहायचे.
मी : हो. तुम्ही आयुष्यभर निष्काम कर्म केलेत.
अप्पा : निष्काम कर्म करत रहायचे.
४ इ २. वडिलांना चुकांविषयी खंत वाटणे आणि त्यांनी क्षमायाचना करणे
अप्पा : माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या.
मी : तुमच्याकडून काय चुका झाल्या ?
अप्पा : मी पुष्कळ चुका केल्या आहेत. मला माझ्या चुका सांगा.
मी : अप्पा, सगळ्यांकडून चुका होतात. झालेल्या चुकांसाठी आपण देवाकडे क्षमा मागूया. देव आपल्याला क्षमा करील.
अप्पा : देवा, श्रीरामा, माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला क्षमा कर. रामा, मला क्षमा कर .. क्षमा कर.’
– सौ. लक्ष्मी नारायण पाटील
४ ई. देवाच्या अनुसंधानात असणे : ‘अप्पा सतत ‘श्रीराम, दत्त, श्रीकृष्ण, राखमलस्वामी (राखमलस्वामी हे ग्रामदैवत आहे. बाबा प्रतिदिन मंदिरात जात असत.) या देवतांची नावे घ्यायचे. ते सतत म्हणायचे, ‘‘मला कुणी जाणले नाही. माझी शक्ती जाणली नाही. रामा, मला यातून मुक्त कर.’’ त्यांची स्थिरता पाहून रुग्णालयात सेवेला असणारी व्यक्ती म्हणाली, ‘‘तुमचे वडील कोणत्या मंदिरात जात होते का ?’’
४ उ . वडिलांची छायाचित्रे पाहून ‘त्यांची साधना चालू आहे’, असे जाणवणे आणि मनातील काळजीचे विचार दूर होऊन मन स्थिर होणे : बाबांना ५ दिवसानंतर पुणे येथील दुसर्या रुग्णालयात भरती केले. (आधी ते आमच्या गावाच्या शेजारच्या लोणंद या गावातील रुग्णालयात भरती होते.) तेव्हा त्यांची स्थिती पुष्कळ नाजूक होती. बहिणीने (मोठी बहीण सौ. धनश्री िशंदे हिने) पाठवलेली बाबांची छायाचित्रे मी पाहिली. त्यांतील बाबांच्या हातांची नमस्काराची मुद्रा आणि त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहून मला आनंद झाला. ‘बाबा सतत देवाच्या अनुसंधानात आणि भावस्थितीत आहेत’, असे मला जाणवले. ‘त्यांची साधना चालू आहे’, असे मला जाणवले आणि माझ्या मनातील काळजीचे विचार नाहीसे होऊन माझे मन स्थिर झाले.
५. वडिलांना रुग्णालयातून घरी आणल्यावर जाणवलेली सूत्रे : बाबांवर पुढील उपचार करणे शक्य नव्हते; म्हणून आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार आम्ही बाबांना घरी आणले. तेव्हा २ दिवस आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.
५ अ. बाबांना घरी आणल्यापासून घरात त्रास किंवा दाब जाणवत नव्हता.
५ आ. सूक्ष्मातून दैवी लोक आणि दैवी रथ दिसणे, वडिलांचे निधन झाल्यानंतर सूक्ष्मातून दिसलेल्या दृश्याची आठवण होणे आणि ‘तो रथ वडिलांना नेण्यासाठी आला असून वडील साधनेच्या दृष्टीने चांगल्या टप्प्याला पोचले आहेत’, असे वाटणे : बाबांचे निधन होण्याच्या आदल्या रात्री मला झोप लागत नव्हती. माझी पाठ दुखत असल्याने मी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास अंथरुणावर पहुडले होते. तेव्हा मला दिसले, ‘एक दैवी लोक आहे आणि त्यात दैवी रथ आहे.’ नंतर मला झोप लागली. त्यानंतर अकस्मात् ४.३० वाजता मला जाग आली. मी लगेच उठून बाबांजवळ गेले. त्या वेळी त्यांचा श्वास पुष्कळच मंद झाला होता. ते एकदम शांत होते. त्यानंतर ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा श्वास पूर्ण बंद झाला. तेव्हा मला वाटले, ‘मला झोप लागण्यापूर्वी जो दैवी रथ दिसला होता, तो बाबांना नेण्यासाठी आला होता. बाबा साधनेच्या दृष्टीने चांगल्या टप्प्याला पोचले आहेत.’
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि संत यांची अनुभवलेली कृपा ! : बाबांच्या आजारपणात देवाने आमच्याकडून सनातनच्या संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय करून घेतले. आम्हाला काही अडचण आल्यास त्यांचे आम्हाला लगेच मार्गदर्शन मिळत होते. त्यामुळे आम्हाला कठीण प्रसंगात स्थिर रहाता आले. देवाने बाबांकडून शेवटच्या क्षणापर्यंत साधना करून घेतली अन् आम्हालाही त्यांच्या सेवेची संधी दिली. त्याबद्दल मी परम दयाळू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सर्व संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सौ. लक्ष्मी पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.९.२०२३)
७. अल्प अहं : ‘बाबांना कोणीही वाईट बोलले, तरीही बाबा त्यांच्याविषयी कधीच वाईट बोलले नाहीत किंवा बाबांनी त्यांच्याविषयी कधी गार्हाणे केले नाही. बाबांचा अहं अल्प असल्याने ते पुन्हा त्यांच्याशी बोलायचे. बाबांना ‘इतरांचे चांगले व्हावे’, असे वाटत असे.
८. ते सतत श्रीरामाचा नामजप करत असत. ते रुग्णाईत असतांनाही त्यांचा नामजप सतत चालू होता.
९. ते रुग्णालयात अतीदक्षता विभागात असतांनाही आनंदी आणि निरागस दिसत होते.’
– सौ. छाया राऊत (कै. वसंत गायकवाड यांची चौथ्या क्रमांकाची मुलगी), हडपसर, पुणे. (५.९.२०२३)
|