अंधविश्वास विज्ञानाविषयी कि अध्यात्माविषयी ?
१. अध्यात्माचा अभ्यास नसलेल्या विज्ञानवाद्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर बोलणे, हा मूर्खपणा अन् टोकाचा अहंकार !
‘एकदा मी एका शहरात गेलो होतो. तेथे वैद्यकीय व्यवसाय करणार्या आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) एका संघटनेत धर्मातील अंधश्रद्धांविषयी एका नास्तिकतावादी कार्यकर्त्याने विषय मांडला होता. तेथील माझे एक डॉक्टर मित्र मला म्हणाले, ‘‘देव ही केवळ कल्पना आहे’, ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, ‘वेद थोतांड आहेत’, इत्यादी गोष्टी अंधश्रद्धा असल्याचे सांगितले. त्यामुळे बरेच जण संभ्रमित झाले आहेत. सर्व धर्मपरायण लोक आहेत; मात्र आता त्यांना योग्य काय नि अयोग्य काय ? हे लक्षात येत नाही. तेव्हा तुम्ही त्यांना धर्माविषयीची महती सांगा.’’ तेव्हा मी उपस्थितांशी व्यासपिठावरून संवाद साधला. मी त्यांना सांगितले, ‘‘या विज्ञानयुगामध्ये ज्याचा ज्या विषयाचा अभ्यास आहे, त्याला त्या विषयाचा तज्ञ संबोधले जाते. रुग्णही स्वत:च्या व्याधीनुसार तज्ञ निवडतात किंवा आधुनिक वैद्यही त्यांच्याकडे भरती झालेल्या रुग्णांना अन्य व्याधी असल्याचे लक्षात आल्यास संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार करतात. एवढेच नाही, तर न्यायालयीन प्रक्रियेतही जेव्हा एखाद्या विषयासंबंधीची समस्या न्यायालयासमोर येते, तेव्हा न्यायालय त्या त्या विषयाच्या तज्ञांना ‘तज्ञ पुरावा’ (एक्स्पर्ट व्हिटनेस) म्हणून पाचारण करतात. डोळ्यांविषयी न्यायालयीन निवाडा द्यायचा असेल, तर केवळ डोळ्यांविषयीचे तज्ञ बोलावले जातात. आधुनिक वैद्य आहेत; म्हणून कोणत्याही आधुनिक वैद्याला किंवा कोणत्याही तज्ञांना बोलावले जात नाही. अर्थात् अन्य क्षेत्रात एखाद्या आधुनिक वैद्याने विदेशात जाऊन अधिक उच्च शिक्षण घेतले असेल, तरी त्याला न्यायालय बोलावत नाही. असे असतांना आपल्याला ज्या विषयाची माहिती नाही, त्याविषयी अधिकार असल्यासारखे बोलणे, हे मूर्खपणाचे ठरते. त्यातही जर आपण धर्माविषयी काहीच अभ्यास केला नसेल, साधना केली नसेल किंवा धर्म ही संकल्पनाच मान्य नसेल, तर एखाद्या धर्मात श्रद्धा आहेत कि अंधश्रद्धा ? यांविषयी काहीही बोलणे, हा विज्ञान शिकलेल्यांच्या मूर्खपणा आणि टोकाचा अहंकार ठरतो. हे सूत्र सर्वांना मान्य आहे का ?’’, असे मी सर्वांना विचारले, तेव्हा सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी एकसुरात ‘हो’ म्हटले.
त्या वेळी मी सर्वांना सांगितले की, आज आपण एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आपल्या क्षेत्रातील काही अंधविश्वासांची (अंधश्रद्धांची नव्हे) चर्चा करूया. मी विचारायला प्रारंभ केला. ‘मनुष्य पहाण्याची क्रिया कशाने करतो ?’, तेव्हा सर्वांनी सांगितले, ‘मनुष्य डोळ्यांनी पहातो.’ ‘मनुष्य डोळ्यांनी पहातो हा विश्वास कि अंधविश्वास ?’, असा मी प्रश्न विचारला. जर आपण बाहेरून दिसणारे डोळे तसेच ठेवले आणि आतील डोळ्यांचा पडदा (रेटिना) काढून टाकला, तर मनुष्याला दिसेल का ? तेव्हा सर्वजण म्हणाले, ‘नाही !’, म्हणजे ‘मनुष्य डोळ्यांसह पडद्याने पहातो, हे सत्य आहे का ?’ तेव्हा सर्वजण ‘हो’ म्हणाले. याचा अर्थ सामान्य मनुष्य असो किंवा वैद्यकीय व्यावसायिक असो, ‘जेव्हा मी डोळ्यांनी पहातो’, असे म्हणतो, तेव्हा तो वैद्यकीयशास्त्रदृष्ट्या अंधविश्वासच झाला ना ?
नंतर मी सर्वांना विचारले की, डोळा आणि पडदा तसाच ठेवला; पण डोळ्यांची नस (ऑप्टिक नर्व्ह) कापली किंवा ती कार्यहीन झाली, तर मनुष्य पाहू शकेल का ? त्यावर आता सर्वजण सावध झाले होते. ते म्हणाले, ‘‘नाही.’’ म्हणजे मनुष्य केवळ डोळे किंवा पडदाच, नव्हे तर डोळ्याच्या नसेनेही पहातो. म्हणजेच काय सामान्य मनुष्य किंवा वैद्यकीय व्यावसायिक काय, जेव्हा ‘मी डोळे आणि मागील पडद्याने पहातो’, असे म्हणतो तेव्हाही तो वैद्यकीयशास्त्रदृष्ट्या अंधविश्वासच झाला ना ?
त्यानंतर मी त्यांना म्हटले डोळे, पडदा, नस सर्व चांगले आहेत; परंतु मेंदूतील पहाण्याची जी जागा आहे, (व्हिज्युअल कॉर्टेक्स) ती कार्यहिन झाली, तर दिसेल का ? त्यावर उत्तर आले, ‘‘नाही दिसणार.’’ याचाच अर्थ मनुष्य मेंदूनेही पहातो. डोळे, पडदा, नस आणि मेंदू यांनी मनुष्य पहात असतो. याचाच अर्थ सामान्य मनुष्य किंवा वैद्यकीय व्यावसायिक काय जेव्हा ‘मी डोळे, मागील पडदा, नस, मेंदू याने पहातो’, असे म्हणतो, तेव्हा तोे वैद्यकीयशास्त्रदृष्ट्या बरोबर होते.
आपण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहोत. सर्वजण म्हणतात की, मी डोळ्यांनी पहातो किंवा मनुष्य डोळ्यानी पहातो; पण हे म्हणजे वैज्ञानिक आहेे का ? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत. तसेच धर्मात काय श्रद्धा
आहेत ? आणि काय अंधश्रद्धा आहेत ? याचा ऊहापोह केला पाहिजे. मला कळले की, येथे कुणीतरी आले होते. त्यांनी अभ्यास केलेल्या वैद्यकीय ज्ञानाहून त्यांनी ज्याचा अभ्यास केला नाही, किंबहुना ज्याचा तिरस्कार केला, अशा धर्माविषयीच्या अंधविश्वासांविषयी चर्चा करणे, हे मूर्खपणाचे नव्हे का ? मी जेवढा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केला आहे, तेवढा धर्म आणि अध्यात्म यांविषयीही अभ्यास केला आहे, तसेच साधनाही केली आहे. तेव्हा आज आपण धर्म म्हणजे काय ? अध्यात्म म्हणजे काय ? तसेच साधनेची आवश्यकता काय ? यांविषयी पाहूया.
२. अध्यात्माला विरोध करणार्या तथाकथित विज्ञानवाद्याला त्याच्याच भाषेत अध्यात्माचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक !
त्यानंतर मी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी माहिती दिली. हा विषय ऐकल्यानंतर तेथील धर्मपरायण वैद्यकीय व्यावसायिकांचे सर्व संभ्रम दूर झाले आणि त्यांनी माझा विषय जिज्ञासेने अन् आवडीने समजून घेतला. एकूण काय, तर आपण विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही शिकल्यानंतर एखादी तथाकथित विज्ञानवादी जेव्हा अध्यात्माविषयी ओरडतो, तेव्हा त्याला त्याच्या भाषेत अध्यात्माचे महत्त्व लक्षात आणून दिले, तरच ते त्याला कळते. ज्याला अभ्यासच करायचा नाही, तसेच धर्म, अध्यात्म आणि साधना समजूनच घ्यायची नाही, त्याला केवळ विरोधच करायचा आहे, अशांच्या पालथ्या घागरीवर पाणी टाकून काय उपयोग ? ती घागर कधीच भरणार नाही.’
(क्रमशः)
– (सदगुरु) डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (ऑगस्ट २०२३)