द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या बुद्धीचा अस्त !
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)
तमिळनाडूमध्ये २ सप्टेंबर या दिवशी ‘सनातन निर्मूलन परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या कुलदीपकाने सनातन धर्माला विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची उपमा देऊन अपमान केला. त्या कुलदीपकाचे नाव उदयनिधी (तमिळनाडू राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी) असे आहे. त्यांनी सनातन धर्माविषयी काढलेले उद्गार त्यांच्या बुद्धीचा अस्त झाल्याचे निदर्शक आहे. मी असे का म्हणतो ? ते या लेखात सकारण स्पष्ट करत आहे.
१. सनातन धर्माला काळालाही नष्ट करता येणे अशक्य !
जगातील अनेक विद्वानांनी हिंदु धर्म आणि त्याची संस्कृती, म्हणजेच सनातन धर्म यांविषयी गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. सनातन धर्माचे वैशिष्ट्य असे की, हा धर्म सृष्टीच्या निर्मितीपूर्वी होता, तसेच तो सृष्टी नष्ट झाल्यानंतरही अस्तित्वात असणार आहे. त्यामुळे सनातन धर्म सर्वसामान्य माणसालाच नव्हे, तर काळालाही नष्ट करता येणार नाही. जो काळाच्या तावडीतून सुटलेला आहे किंवा ज्याच्यावर काळाची ही सत्ता चालत नाही, अशा सनातनला संपवण्याची दिवास्वप्ने जो पहातो, त्या माणसाची बुद्धी अस्ताला गेली आहे, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.
२. सनातन धर्माला संपवण्याचा निश्चय करणार्यांची बुद्धी अस्तास गेली !
या सनातन धर्माचे आधारभूत ग्रंथ म्हणजे वेद, उपनिषदे आणि गीता ! हे सारे ग्रंथ जगाच्या वाङ्मयात सर्वोच्च असल्याचे देश-विदेशातील अनेक विद्वानांनी मुक्तकंठाने म्हटले आहे. जगातील मोजक्याच विद्वानांनी सनातन धर्माच्या ग्रंथांविषयी काढलेले उद्गार जेव्हा आपण पडताळून पाहू, त्या वेळी आपल्याला नक्की खात्री पटेल की, सनातन धर्माला संपवण्याचा निश्चय किंवा संकल्प ज्यांनी केला त्यांची बुद्धी अस्तास गेली आहे.
३. पाश्चात्त्य तत्त्वज्ञ विक्सर कर्झन यांनी वैदिक वाङ्मयाविषयी काढलेले गौरवोद्गार !
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात प्रसिद्ध असलेल्या विक्सर कर्झन यांनी एका मोठ्या सभेत वैदिक वाङ्मयाविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, ‘‘आम्ही जेव्हा युरोपात अलीकडे झपाट्याने प्रसृत होण्यास आरंभलेल्या पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे त्यातही मुख्यत्वे करून भारतातील उदात्त आणि अतीरसमय तत्त्वज्ञानाच्या अतिशय रहस्यपूर्ण, बहु महत्त्वाच्या वैदिक ग्रंथ भांडाराचे जेव्हा आम्ही सूक्ष्म रितीने अवलोकन करतो, तेव्हा वेद, वेदांतांनी सुशोभित झालेल्या तात्त्विक रत्नसागरात पाश्चात्त्य पंडितांच्या भेदक दृष्टीला सुद्धा दिपवून टाकणारी आणि निसर्ग रमणीय असणारी अमौलिक अशी अपार सिद्धांत रत्ने आढळतात. याचा विचार केला असता आम्हा युरोपियनांची बुद्धी अतीमुग्ध आणि स्तब्ध होते. काही तत्त्वज्ञानाच्या प्रमेयांचा विचार करतांना यापूर्वीही काही प्रसंगी युरोपियनांची बुद्धी स्तब्ध होण्यासारखे काही प्रसंग आले होते. त्यापेक्षाही भारतीय प्रमेय आणखी अधिक गहन आणि महत्त्वपूर्ण आहेत. विश्वाचे मार्गदर्शन करणार्या विश्वभाग्योदयाच्या या अपौरुषेय वैदिक वाङ्मयाच्या पुढे त्याच्या त्या भव्य-दिव्य ते पुढे कितीही नाही म्हटले, तरी भावावेशाने शेवटी गुडघे टेकून आम्हा सर्वांनाच मस्तक लवविणे (झुकवणे) भाग पडते. असा काही त्याचा विलक्षण दैवी प्रभाव आहे. ‘आपण कोण ?’, हे समजून घेऊन सर्वांना मूलस्वरूपी अचूक ओळख पटवून देणार्या, आत्मसाक्षात्कार करून देऊन सर्वांचा उद्धार करणार्या अशा या मूलग्राही सर्वोत्तम तत्त्वज्ञानाचे जन्मस्थानच भारत वर्ष असल्यामुळे अखिल मानवाच्या शुद्ध धर्माची ही केवळ मायभूमी आहे.’’
४. पाश्चात्त्य पंडित जपोलियट यांनी वेदांविषयी मांडलेले सत्य !
जपोलियट नावाचा एक पाश्चात्त्य पंडित आहे. त्यांनी ‘द बायबल इन इंडिया’ या नावाच्या एका ग्रंथात सृष्टीच्या उत्पत्तीविषयी अनेक मतमतांतराचा उल्लेख केला. त्यानंतर वैदिक मताचा उल्लेख करतांना त्यांनी लिहिले…‘‘सर्व धर्माचे लोक आपापला धर्मग्रंथ ईश्वरदत्त आहे, असे म्हणतात. त्या सर्व ईश्वरदत्त धर्मग्रंथात ‘अपौरुषेय वेद’ एक असा ईश्वर दत्त धर्मग्रंथ आहे की, ज्याचे विचार यात सावकाशपणे क्रमसृष्टीचा उपदेश असल्यामुळे आधुनिक विज्ञानाशी जुळतात. आम्हाला समंजस वाटतात आणि पटतात. केवळ करून टाकणारे सोलीव (चिकित्सा करून स्वीकारलेला) सत्य या एका वेद ग्रंथातून मात्र आढळते.’’
५. आधुनिक विज्ञान हे वेदांमधील अबाधित सिद्धांताचे केवळ अनुकरण ! – व्हिलर विल्लॉक्स, अमेरिका
अमेरिकेच्या व्हिलर विल्लॉक्स नामक एका विदुषीने (विद्वानाने) अशाच प्रकारचे मत प्रकट करतांना म्हटले, ‘‘भारताच्या अतीप्राचीन वैदिक धर्माविषयी आम्ही पूर्ण ऐकले आणि वाचले आहे. भारत हे त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि श्रेष्ठ अशा वेदांचे जन्मस्थान आहे. या वेदांमध्ये संपूर्ण दिव्य जीवनाच्या धार्मिक तत्त्वांचे एक केवळ विवेचन नसून आजपर्यंतच्या अखिल विज्ञानाच्या विविध शास्त्रांनी सिद्ध करून प्रचारात आणलेल्या आणि सत्य म्हणून विश्वासून असणार्या अखिल वैज्ञानिक सिद्धांताचे ही विवेचन आहे. इलेक्ट्रिसिटी (वीज), रेडियम्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि विमाने इत्यादींचे ज्ञान हे तपोबलाने वेदांचा शोध लावलेल्या त्या वेदद्रष्ट्या ऋषींना होते, असे आढळून येते. आधुनिक विज्ञान, म्हणजे वेदांमधील अबाधित सिद्धांताचे केवळ अनुकरण आहे.’’
६. ‘उपनिषदे’च माझ्या आयुष्याचे समाधान ! – शोपेनहावर, जर्मन तत्त्ववेत्ता
शोपेनहावर नावाचा एक जर्मन तत्त्ववेत्ता वैदिक वाङ्मयाविषयी स्वतःचे मत वा अनुभव प्रकट करतांना म्हणतो, ‘‘माणसाच्या मनोभूमिकेला पराकाष्ठेच्या उन्नतीला पोचवून मानव जातीवर मोठे उपकार करणार्या उपनिषदांच्या अभ्यासावाचून सर्व जगात इतका लाभकारक आणि उन्नतीकारक असा दुसरा कोणताही श्रेष्ठ अभ्यास नाही. ‘उपनिषदेच’ माझ्या आयुष्याचे समाधान ! याच्या आश्रयानेच मी नितांत सुखी आणि समाधानाचे दिव्य जीवन अनुभवात आहे. याच्या छत्रछायेखालीच शेवटी निरतिशय सुख शांतीने मी देहत्याग करीन.’’
७. संपूर्ण जगात वैदिक तत्त्वज्ञानाखेरीज अन्य श्रेष्ठ तत्त्वज्ञान आढळत नाही ! – मॅक्स मुल्लर, संस्कृत अभ्यासक
संस्कृत अभ्यासक मॅक्स मुल्लर यांनी शोपेनहावर यांच्या या मतावर आपल्या सहमताची स्वाक्षरी करतांना म्हटले, ‘‘शोपेनहावर यांनी केलेल्या विधानाच्या दृढतेकरता माझी ही स्वाक्षरी जर कुणाला अपेक्षित असेल, तर मी माझ्या सकळ धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या दीर्घ परिश्रमाचा अंतिम निर्णय म्हणून केव्हाही मोठ्या आनंदाने देण्यास मी एका पायावर सिद्ध आहे. आत्मतृप्तीने सकाळी मरणाचे स्वागत करण्यास अवश्य असलेल्या सिद्धतेला तत्त्वज्ञानाचा अभ्यासच कारण होतो. असे झाल्यास एका वैदिक तत्त्वज्ञानावाचून दुसरे असे कोणतेही श्रेष्ठ तत्त्वज्ञान संपूर्ण जगातच मला कुठे आढळत नाही आणि आहे असेही वाटत नाही.
८. ‘श्रीमद्भगवद्गीते’विषयी हंबोल्स आणि वॉरन हेस्टिंग्ज यांनी काढलेले उद्गार
अ. ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाविषयी हंबोल्स म्हणतात, ‘‘सर्वच दृष्टीने अतिशय सुंदर किंबहुना जगातील सर्व भाषांमधील सार्याच गीतांतच खर्या तत्त्वज्ञानाचा सर्वतोपरी खरोखर योग्य असा एकच एक अचूक ग्रंथ म्हणजे ‘भगवद्गीता’ !’’
आ. ‘गांभीर्यपूर्ण विचारसरणी, मनाला पटण्यासारखे सयुक्तिक विवेचन आणि लयबद्ध छंद इत्यादी गोष्टींनी ‘गीता’ हा ग्रंथ जगातच बिनतोड आहे’’, असे उद्गार वॉरन हेस्टिंग्ज यांनी काढले होते.
९. उदयनिधी यांच्या बुद्धीचा अस्त झाला, हेच सत्य !
या विद्वानांची सनातन धर्म, वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता, अशा सनातन धर्माच्या विविध ग्रंथांविषयीची मते जाणून घेतल्यावर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचा कुलदीपक उदयनिधी यांच्या बुद्धीचा अस्त झाला असल्याची प्रचीती कुणालाही येईल. उदयनिधी म्हणतात, ‘‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समता यांच्या विरोधात आहे.’’ जगातील तत्त्ववेत्ते ‘सनातन धर्माचे सर्व ग्रंथ अलौकिक असून जगात सर्वांत श्रेष्ठ असलेले ग्रंथ आहेत’, असे अभिमानाने सांगतात. त्यामुळे उदयनिधी सनातन धर्माविषयी जे अवमानकारक उद्गार काढतात, त्यावरून त्यांची बुद्धी अस्तास गेली आहे, हेच सिद्ध होते.
(संदर्भ : ‘आर्य संस्कृती’, लेखक : प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधर स्वामी आणि ‘वेदांविषयी पाश्चात्त्य मत’, – केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, तिसरी आवृत्ती वर्ष १९९७)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (६.९.२०२३)