सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त होणार्‍या रथोत्सवाच्या ध्वजपथकाचा सराव करतांना आणि रथोत्सवानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेली अनुभूती

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला होता. या रथोत्सवाच्या आरंभी ध्वज घेतलेला साधक, त्यामागे काही सुवासिनी, नंतर ध्वजपथक, त्यामागे टाळपथक, मधोमध सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा रथ, त्यामागे पुन्हा टाळपथक आणि शेवटी पुन्हा ध्वजपथक होते. गुरुकृपेने मला रथापुढील ध्वजपथकात सेवा करण्याची संधी मिळाली होती.

श्री. अपूर्व ढगे

१. सराव करतांना भावजागृती होणे

या रथोत्सवासाठी आम्ही काही साधक काही दिवस आधीपासून सराव करत होतो. सराव करतांना पुष्कळ वेळा आमची भावजागृती होत होती.

२. सराव करतांना सूक्ष्मातून प्रत्यक्ष रथोत्सव अनुभवण्याचा प्रयत्न करणे

सराव करतांना ‘प्रत्यक्ष रथोत्सव कसा असेल ?, ब्रह्मोत्सवाच्या दिवशी वातावरण कसे असेल ?’, हे मी अनुभवण्याचा प्रयत्न करायचो. तेव्हा मला ‘मोठ्या संख्येने साधक दिसून त्यांच्या समोरून रथाचे मार्गक्रमण होत आहे. साधक गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन घेतअसतांना त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येत असून साधकांचे भावाश्रू पाहून ध्वजपथकातून चालतांना माझीही भावजागृती होत आहे’, असे मला दिसायचे.

३. ‘साधकांच्या आनंदात स्वतःचा आनंद आहे’, असे विचार मनात येणे

माझ्या मनात ब्रह्मोत्सवाच्या आधी काही दिवसांपासून विचार येत होता, ‘आम्ही ध्वजपथकामध्ये असल्यामुळे आम्हाला गुरुदेव दिसणार नाहीत; पण ब्रह्मोत्सवासाठी येणार्‍या साधकांच्या डोळ्यांत दिसणार्‍या भावाश्रूंमध्येच मला गुरुदेवांचे दर्शन होईल. गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे साधकांच्या चेहेर्‍यावर ओसंडून वहाणारा आनंद पाहूनच मला आनंद मिळणार आहे. साधकांच्या आनंदात माझा आनंद आहे.’

४. चैतन्य आणि तेज प्रक्षेपित करणारा रामरथ !

ब्रह्मोत्सवाच्या दिवशी रथाचे दर्शन घेतांना ‘हा साक्षात् रामाचा रथ असून तो स्वर्गातून पृथ्वीवर आला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि तेज प्रक्षेपित होत असून ते सर्वत्र पसरले आहे’, अशी अनुभूती मला आली.

५. सराव आणि सेवा यांमुळे विश्रांती घेता न येऊनही चैतन्यामुळे थकवा न येणे

ब्रह्मोत्सवाच्या आधी काही दिवस सराव आणि सेवा लागोपाठ दिवसभर असायच्या. त्या काळात मला विश्रांती घेता आली नाही; पण केवळ गुरुदेवांचे चैतन्य कार्यरत असल्यामुळे मला एकदाही थकवा जाणवला नाही.

६. प्रार्थना

‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुम्ही मला आणि सर्व साधकांना जो आनंद देत आहात, त्याचा आम्हाला लाभ करून घेता येऊ देे’, ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. अपूर्व प्रसन्न ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१४.५.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक