‘जी-२०’ झाली कोट्यवधी भारतियांची परिषद ! – पंतप्रधान मोदी
|
नवी देहली – भारतात ‘जी-२०’ जनतेची परिषद झाली असून कोट्यवधी भारतीय या परिषदेशी जोडले गेले, असे पंतप्रधान मोदी यांनी परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात सांगितले. येथील प्रगती मैदानातील ‘भारत मंडपम्’ या भव्य सभागृहामध्ये सकाळी साडेनऊ वाजता जी-२० परिषदेला प्रारंभ झाला. प्रारंभी मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५५ देशांचा संघ असलेल्या ‘आफ्रिकन युनियन’ला ‘जी-२०’ परिषदेचा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव संमत केला. यामुळे आता जी-२० परिषद ‘जी-२१’ झाली आहे. प्रस्ताव संमत झाल्यावर आफ्रिकन युनियनचे प्रमुख अझाली असोमानी यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली. भारताने आफ्रिकन युनियनला परिषदेमध्ये स्थायी सदस्य बनवण्यासाठी पुढाकार घेतला होता.
परिषदेस प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम्मध्ये सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना भारत मंडपम्मध्ये उभारण्यात आलेल्या कोणार्क येथील सूर्यमंदिराच्या चक्राच्या प्रतिकृतीविषयी माहिती दिली. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ आणि सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान हे शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ९ सप्टेंबरच्या सकाळी भारतात पोचले. ८ सप्टेंबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात पोचल्यानंतर ते थेट पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथे त्यांनी जवळपास १ घंटा द्विपक्षीय चर्चा केली.
My remarks at Session-1 on ‘One Earth’ during the G20 Summit. https://t.co/loM5wMABwb
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2023
पंतप्रधान मोदी यांच्या नावाच्या पाटीवर इंग्रजीत लिहिण्यात आले ‘भारत’!
‘जी-२०’ परिषदेत पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी बसले होते, तेथे त्यांच्या समोरील देशाच्या नावाच्या पाटीवर इंग्रजीमध्ये ‘भारत’ असे लिहिण्यात आले होते. आतापर्यंतच्या इंग्रजीमध्ये देशाचे नाव लिहितांना ते ‘इंडिया’ असे लिहिण्यात येत होते; मात्र यंदा प्रथमच ‘भारत’ असे लिहिण्यात आले. यातून केंद्रशासन ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ हे नाव इंग्रजीतही प्रचलित करत असल्याचे स्पष्ट होत आहे. या परिषदेत सहभागी होणार्या देशांच्या प्रमुखांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रात्रीच्या भोजनाची निमंत्रण पत्रिका पाठवतांना त्यावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले होते. आतापर्यंत निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ असे लिहिले जात होते.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात मांडलेली सूत्रे
१. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा मंत्र सर्वांसाठी मार्गदर्शक !
२१ व्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ आहे. या काळात अनेक वर्षांपासूनची आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे आशेने पाहिले जात आहे. यासाठी मानवकेंद्रीत दृष्टीकोन ठेवून प्रत्येकाला दायित्वाने पुढे जायचे आहे. यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा मंत्र आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
२. जी-२० च्या अंतर्गत देशातील ६० शहरांमध्ये २०० हून अधिक बैठका !
भारताचे ‘जी-२०’ परिषदेचे अध्यक्षपद देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर समावेशकता अन् सर्वांना समवेत घेण्याचे प्रतीक झाले आहे. देशातील ६० शहरांमध्ये ‘जी-२०’ परिषदेच्या २०० हून अधिक बैठका झाल्या आहेत.
३. आव्हानांवर उपाययोजना काढण्याकडे वाटचाल करावी लागेल !
जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार असो; उत्तर आणि दक्षिणमधील विभागणी असो, पूर्व अन् पश्चिम यांच्यातील दुरावा असो, अन्न, इंधन आणि खते यांचे व्यवस्थापन असो, आतंकवाद आणि सायबर सुरक्षा असो किंवा आरोग्य, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा असो, वर्तमानासह भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला या आव्हानांवर उपाययोजना काढण्याकडे वाटचाल करावी लागणार आहे.
४. २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी भारताने दिला मानवतेच्या कल्याणाचा संदेश !
आपण ज्या ठिकाणी जमलो आहोत, त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर ‘मानवतेचे कल्याण आणि सुख नेहमीच सुनिश्चित केले जायला हवे’, असा संदेश देण्यात आला आहे. २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी भारताच्या भूमीने हा संदेश जगाला दिला होता. या संदेशानिशी आपण या ‘जी-२०’ शिखर परिषदेला प्रारंभ करूया, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
भारतासह ८ देशांच्या आर्थिक महामार्गाला संमती !
‘जी-२०’ परिषदेमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका, युरोपातील काही देश, मध्य-पूर्व देश आणि भारत यांच्यामध्ये आर्थिक महामार्ग बनवण्यावर एकमत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती दिली. अमेरिका, जर्मनी, इटली, जॉर्डन, इस्रायल, सौदी अरेबिया आणि भारत यांच्यात हा आर्थिक महामार्ग बनवण्यात येणार आहे. या मार्गाद्वारे त्यांच्यात व्यापार होणार आहे. रेल्वे आणि बंदर यांच्या माध्यमांतून हे देश एकमेकांशी जोडले जाणार आहेत. चीनकडून अशाच प्रकारचा महामार्ग बांधण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून हा मार्ग निर्माण करण्यात येत आहे, असे याकडे पाहिले जात आहे. चीनच्या महामार्गाला अनेक देशांनी विरोध केला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे.
‘जी-२०’ परिषदेच्या संयुक्त घोषणापत्रावर सहमती
भारताच्या मुत्सद्दीपणाचा मोठा विजय : रशियाचा उल्लेख टाळून युक्रेन युद्धाचा उल्लेख !
‘जी-२०’ परिषदेत पहिल्याच दिवशी संयुक्त घोषणापत्रावर सहमती झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी परिषदेच्या दुसर्या सत्राच्या प्रारंभी अध्यक्ष या नात्याने ही माहिती दिली. सर्व सदस्य देशांच्या संमतीने घोषणापत्र पारित करण्यात आले. अशा प्रकारचे घोषणापत्र संमत होणार कि नाही ?, याविषयी जगभरात चर्चा होती. मागील परिषदेमध्ये संयुक्त घोषणापत्र संपत झाले नव्हते, त्यामुळे ही शंका होती. ३७ पानांच्या या घोषणापत्रामध्ये युक्रेन युद्धाचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘सध्या युद्धाचा काळ नाही’, असे यात म्हटले आहे. या युद्धाचा उल्लेख करतांना रशियाचे नाव टाळण्यात आले आहे. यातून भारताने मित्रराष्ट्र रशियाला न दुखावण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. भारतासाठी हे संयुक्त घोषणापत्र संमत होणे मोठे यश आहे. भारताच्या मुत्सद्दीपणाचा हा विजय असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिका आणि युरोपीय देश यांनी ‘घोषणापत्रात युक्रेन युद्धावरून रशियाच्या विरोधात कठोर भाषा वापरावी’, असा दबाव आणला होता. भारताने त्यांना यापासून परावृत्त करून युक्रेन युद्धाचा रशियाला वगळून उल्लेख करण्यात यश मिळवले. याचे चीनने समर्थन केले.
या घोषणापत्रात सर्व प्रकारच्या आतंकवादाचा निषेध करण्यात आला आहे. या घोषणापत्रात ४ वेळा ‘युक्रेन’चा, तर ९ वेळा ‘आतंकवाद’ शब्दाचा उल्लेख आहे.