हिंदू संपण्यासाठी नाहीत, तर ते राखेतून पुन्हा उभे रहाणारे !
तमिळनाडूचे क्रीडामंत्री आणि ‘द्रमुक’चे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एक हिंदुद्वेषी विधान केले. ते म्हणाले, ‘‘डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याप्रमाणे सनातन धर्माला सुद्धा संपवले पाहिजे.’’ ते ज्या परिषदेत बोलत होते, तिचे नावही ‘सनातन निर्मूलन परिषद’ असेच होते. त्यात ते असेही म्हणाले, ‘‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समता यांच्या विरोधात आहे.’’ इतक्यावरच न थांबता ‘द्रविड भूमीमध्ये सनातन धर्माला रोखण्याचा आमचा संकल्प कायम आहे’, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पाठोपाठ कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे म्हणाले, ‘‘जो धर्म समान अधिकार देत नाही आणि मनुष्याप्रमाणे वागवत नाही, तो धर्म एखाद्या रोगाप्रमाणे आहे.’’
१. सनातन हिंदु धर्माचा अर्थ
या सर्वांतून हे स्पष्ट आहे की, या सगळ्या भावना कट्टर हिंदुद्वेषामधून आल्या आहेत, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही; मात्र इथे या सगळ्यांनी ‘सनातन हिंदु धर्म म्हणजे काय ? हे समजून घेतले आहे का ?’, हे पहाणे आवश्यक आहे. ‘हिंदु धर्म जुनाट आहे, अस्पृश्यतावादी आहे, महिलांना न्यून लेखणारा आहे’, असे यांचे मत आहे; परंतु ‘सनातन’ या शब्दाचा अर्थ ‘नित्य, नूतन’ असा होतो’, हे आपण समजून घेतले पाहिजे. जे सतत नाविन्याची आस धरते, नवीन गोष्टींचा स्वीकार आणि परंपरेचा भक्कम आधार ज्या ठिकाणी आहे, ते सनातन आणि शुद्ध आहे’, असा सनातन हिंदु धर्माचा अर्थ होतो.
२. हिंदू कायमच जिंकणारे आहेत !
खरे म्हणजे हिंदु धर्माची सर्वाधिक आणि पवित्र अशी मंदिरे दक्षिण भारतात आहेत. अनेक हिंदु परंपरा त्या ठिकाणी पाळल्या जातात. अनेक पवित्र स्थळे त्या ठिकाणीच आहेत; पण असे असूनही अशा पद्धतीचा प्रचंड हिंदुद्वेष त्या ठिकाणी असणे आणि तो सतत वाढणे, हे फारच दुर्दैवी आहे, असे म्हणावे लागेल. हिंदूंना संपवण्याचे अनेक प्रयत्न आजपर्यंत झाले; परंतु हिंदू संपले नाहीत. अनेक आक्रमणे या भूमीने सहन केली; परंतु प्रत्येक वेळी हिंदू जिंकत आले आहेत आणि यापुढेही जिंकतच रहातील. त्यांनी शत्रूला धुळीसही मिळवले आहे. आमची (हिंदूंची) मंदिरे तोडली; पण आम्ही ती नव्याने बांधली आणि अधिक वैभवशाली केली. आमचे ग्रंथ जाळले; पण आम्ही ते नव्याने लिहिले. धर्मांतरे केली; पण आम्ही नव्याने त्यांना पुन्हा स्वधर्मात आणले; कारण हिंदू संपणारे नाहीत, तर ते राखेतून पुन्हा उभे रहाणारे आहेत.
३. हिंदु धर्मावर केलेली टीका ही संतापजनकच !
सनातन धर्म हा एक विचार आहे, एक जीवनपद्धत आहे. हिंदु धर्म कायमच सर्वांना समान वागणूक देतो; म्हणूनच प्रभु श्रीराम माता शबरीची उष्टी बोरे खातात, निषादाला आपले मानतात. भगवान श्रीकृष्ण विदुराकडे जेवतात. फक्त हिंदूंमध्येच गार्गी, मैत्रेयी ब्रह्मवादिनी होतात. हिंदूंंमध्येच देवी आहेत. ‘खरे तर या विश्वाचा आरंभच आदिमायेपासून झाला आहे’, असे हिंदु धर्मात सांगितले आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६) म्हणजे ‘जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात’, असे हिंदु धर्म मानतो; पण यापैकी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता केवळ टीका करण्याच्या उद्देशाने केलेली ही विधाने संतापजनक आहेत.
४. उदयनिधी स्टॅलिन यांचा ‘अजेंडा’ (कार्यसूची)
काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, ‘‘हिंदु धर्म धोका आहे.’’ कर्नाटकमध्ये काँग्रेस नेते आणि मंत्री सतिश झारकीहोळी म्हणाले होते, ‘‘हिंदु शब्द घाणेरडा आहे.’’ गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे गोपाळ इटालीया म्हणाले, ‘‘मंदिरात जाऊ नये आणि देवतांची पूजा करू नये.’’ ही आणि अशा पद्धतीची विधाने करणे, हे हास्यास्पद तर आहेतच; पण विचार करण्याजोगीही आहेत; कारण उदयनिधी स्टॅलिन यांचे विधान नीट पाहिले, तर लक्षात येते की, ते म्हणाले, ‘‘सनातन धर्माचा अंत केला पाहिजे.’’ अंत आणि समाप्त हे शब्द वेगळे आहेत. समाप्त झालेली गोष्ट नंतर चालू करता येते; पण अंत झालेल्या गोष्टीला परत प्रारंभ नसतो. त्यांच्या विधानाने त्यांचा ‘अजेंडा’ तर लक्षात आला.
५. हिंदूंनी संघटित होणे महत्त्वाचे
आता मुद्दा आहे की, आपण (हिंदू) काय करणार आहोत ? आपण अजूनही विचार करण्यातच स्वतःचा वेळ घालवणार आहोत कि स्वतःचा काही वेळ तरी हिंदु धर्मकार्यासाठी देणार आहोत ? कारण हे काम कुणा एका व्यक्तीचे, संस्थेचे किंवा पक्षाचे नाही, तर ते प्रत्येक हिंदु धर्मियांचे आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, ‘‘तुम्ही मंदिरे तोडली, ग्रंथ जाळले, गायी कापल्या; पण हिंदू होते, आहेत आणि ते रहातील; कारण हिंदु धर्म ईश्वरनिर्मित आहे. या देशाची माती वेगळी आहे. ती कायम शाश्वत गोष्टी निर्माण करते आणि कितीही आक्रमणे झाली, तरी पुन्हा उठून उभी रहाते; कारण ईश्वराने तिला वचन दिले आहे, ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ८) (अर्थ : सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणार्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो.)’’
– कु. अन्नदा विनायक मराठे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (७.९.२०२३)