हिंदू मातंग समाजाचे मिशनर्यांकडून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी सांगलीत मोर्च्याचे आयोजन !
समस्त हिंदू मातंग समाजाची पत्रकार परिषदेत माहिती
सांगली, ९ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदू मातंग समाजाचे मिशनर्यांकडून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी समाजाच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता विलिंग्डन कॉलेजपासून मोर्च्यास प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोर्चासाठी समस्त हिंदू मातंग समाजाने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मोर्च्याचे प्रमुख श्री. अभिमन्यू भोसले (नाना) यांनी केले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) या वेळी माजी आमदार नितीन राजे शिंदे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हणमंत पवार यांनीही मोर्च्यास पाठिंबा असल्याचे घोषित केले.
मागील काही वर्षांपासून ख्रिस्ती मिशनरी आणि पाद्री हे अंधश्रद्धेचा वापर करून ख्रिस्ती संस्थेत नोकरीचे आमीष दाखवून हिंदू मातंग समाजातील लोकांचा धर्मांतराचा प्रयत्न करत आहेत. धर्मांतर करतांना ख्रिस्त्यांनी मातंग समाजाचे श्रद्धास्थान असणार्या देवतांच्या मूर्तींची विटंबना केली आहे, तसेच त्यांच्याविषयी अपशब्द काढले आहेत. त्यामुळे मिशनरी आणि पाद्री यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या मोर्च्यातून करण्यात येणार आहे.
मोर्च्यामध्ये करण्यात येणार्या अन्य मागण्या…
१. लहूजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील नियोजित जागेत व्हावे.
२. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात यावे.
मोर्च्यास पाठिंबा दर्शवलेल्या संघटना !
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान सांगली, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय मराठा महासंघ, ठाकरे गट, शिवसेना