अकृषी विद्यापिठांकडून इंग्रजी अभ्‍यासक्रमाचे मराठीतून भाषांतर नाही !

शिक्षण संचालकांची कारवाईची चेतावणी !

प्रतिकात्मक चित्र

नाशिक – राज्‍यातील सर्वच अकृषी विद्यापिठांना इंग्रजी अभ्‍यासक्रमाचे मराठीतून भाषांतर करण्‍याचे आदेश देण्‍यात आल्‍यानंतरही त्‍यांच्‍याकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे उच्‍च शिक्षण विभागाच्‍या संचालकांनी २ आठवड्यांत म्‍हणजे १५ सप्‍टेंबरपर्यंत वाणिज्‍य आणि विज्ञान या शाखांच्‍या अभ्‍यासक्रमाच्‍या १० पुस्‍तकांचे मराठीत भाषांतर करण्‍याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्‍यास संबंधित विद्यापिठांवर कारवाई करण्‍यात येईल, अशी चेतावणी शिक्षण संचालकांनी दिली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (एन्.ई.पी.) मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. त्‍यानुसार यंदापासून महाराष्‍ट्रात पदव्‍युत्तर पदवी अभ्‍यासक्रमांना एन्.ई.पी. लागू करण्‍यात आले आहे; परंतु पुढील वर्षापासून पदवीच्‍याही वर्गांना अन् टप्‍प्‍याटप्‍प्‍याने इतरही अभ्‍यासक्रमांना एन्.ई.पी. लागू होईल. जानेवारी २०२३ मध्‍ये राज्‍यातील सर्वच विद्यापिठांच्‍या कुलसचिवांची शिक्षण संचालकांनी बैठक घेऊन त्‍यांना नवीन शैक्षणिक वर्ष अर्थात् जून-जुलै २०२३ पर्यंत सर्वच इंग्रजी अभ्‍यासक्रमांचे मराठीत भाषांतराचे आदेश दिले होते. त्‍यानुसार अभियांत्रिकीच्‍या क्रमिक पुस्‍तकांच्‍या भाषांतराला प्रारंभ झाला आहे.

संपादकीय भूमिका :

  • यावरून अकृषी विद्यापिठांना मराठी भाषेविषयी किती आपुलकी आणि प्रेम आहे, हे दिसून येते.
  • मराठीत भाषांतर न करणार्‍या विद्यापिठांवर कारवाई केली पाहिजे.