अजित पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३१ आमदारांना अपात्र करावे !
शरद पवार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी !
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह यांवर दाखवलेला हक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी अमान्य केला आहे. याविषयी निवडणूक आयोगाला लेखी कळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३१ आमदारांना अपात्र करण्याची मागणीही शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. यामध्ये अजित पवार यांसह सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पक्षाचे नाव अन् पक्षचिन्ह यांसाठी संघर्ष चालू होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar Vs Sharad Pawar | राष्ट्रवादीत आणखी तीव्र संघर्ष? अजित पवार गट-शरद पवार गट दावे कोणते?#sharadpawar #ajitpawar #ncp #maharashtrapolitics pic.twitter.com/XcjJt77IGl
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 8, 2023
१. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह सत्तेत सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेण्याच्या घटनेला २ मास झाले आहेत; मात्र अद्याप अजित पवार यांचे समर्थक आमदार कोण आणि शरद पवार यांचे समर्थक आमदार कोण ? यांविषयी स्पष्टता नाही.
२. शरद पवार यांनी ३१ आमदारांना अपात्र करण्याविषयी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे हे सर्व आमदार अजित पवार यांच्या गटातील असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
३. दोन-तृतीयांशहून अधिक आमदार पक्षातून बाहेर पडले, तर त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार आहेत. त्यांची दोन-तृतीयांश संख्या ३५ इतकी होते. अजित पवार यांच्यासमवेत ३१ आमदार असतील, तर आणखी ४ आमदारांच्या पाठिंब्याने दोन-तृतीयांश संख्याबळ होते. याचा अर्थ अजित पवार यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकत नाही.
४. यापूर्वी शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन आपली ‘शिवसेना’ हीच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असल्याचे घोषित केले. हा वाद निवडणूक आयोगापुढे आल्यावर निवडणूक आयोगानेही ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले.
५. राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन-तृतीयांश संख्याबळ अजित पवार यांच्या बाजूने झाल्यास ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ हे नाव आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे.