‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांचा लंडनच्या आस्थापनासमवेत करार
|
रत्नागिरी – जिल्ह्यातील लांजा येथील ‘फणस किंग’ म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांच्या ‘जॅक फ्रूट ऑफ इंडिया’ या आस्थापनाने लंडनमधील ‘सर्क्युलरिटी इनोव्हेशन हब’ (‘CIH’) या आस्थापनासमवेत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. मिथिलेश देसाई यांना भारतासाठी ‘CIH’च्या ब्रँड अॅम्बेसेडरचे (राजदूतचे) दायित्व या सामंजस्य कराराद्वारे देण्यात आले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एक सहस्राहून अधिक शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे.
या सामंजस्य करारामुळे कोकणातील आंब्याच्या साली, काजूचे बोंड या टाकाऊ वस्तूंपासून आर्थिक उत्पन्न देणार्या आणि ज्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठे बाजारमूल्य आहे, अशांचे उत्पादन करण्याचे काम हे आस्थापन करणार आहे.
देसाई म्हणाले की, भारतातील शेतकर्यांना भेडसावणार्या समस्यांची मला जाणीव आहे. आम्ही भारतीय शेतकरी केवळ ऑनलाईन माध्यमांद्वारे आणि भागीदारीद्वारे शेतीतील तंत्रज्ञानाची ओळख करून देतो. CIH द्वारे आता आमच्या पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाची कार्यवाही करण्याची संधी आम्हाला मिळेल.