पेट्रोल पंपांवरील असुविधा !
महामार्गावरील किंवा निमशहरी भागातील काही पेट्रोल पंपांवर अत्यावश्यक सुविधांचा अभाव आढळतो. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, तक्रारनिवारण पुस्तिका, प्रथमोपचार पेटी, अग्नीशमन यंत्रणा, तसेच हवा भरण्याची सुविधा यांची कमतरता असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी पंपावरील कर्मचार्यांनाच या सुविधाची माहिती नसते, तर काही ठिकाणी केवळ शासनाची सक्ती आहे; म्हणून स्वच्छतागृह बांधून ठेवलेले आहे. त्याचा वापर केला जात नाही. काही ठिकाणी ‘स्वच्छता कुणी करायची ?’, म्हणून स्वच्छतागृहांना कुलूप ठोकलेले असते. काही ठिकाणी केवळ कर्मचारीच त्यांचा वापर करत आहेत. काही ठिकाणी प्रवाशांना त्यांची माहिती देणारे फलक लावलेले नाहीत. पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे निदान स्वच्छ असली पाहिजेत. अनेक दिवस त्यांची स्वच्छता होत नाही. रस्त्यावर दुर्गंधी पसरलेली असते. काही ठिकाणी महिला, पुरुष यांना स्वतंत्र स्वच्छतागृहे असणे बंधनकारक असतांना एकच स्वच्छतागृह वापरले जाते. काही ठिकाणी अग्नीरोधक यंत्रणांचा पत्ताच नसतो. वाळूने भरलेल्या बादल्या नसतात. काही ठिकाणी त्यात गुटखा, तंबाखू, पान खाऊन थुंकण्यासाठी किंवा विडी, सिगारेट यांची थोटके टाकण्यासाठी त्याचा वापर होत आहे ! ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नागरिकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात प्रशासन कुठे आणि कसे अल्प पडत आहे ?’, याचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. ग्राहकांना उपरोक्त सुविधा उपलब्ध करून देणे, हे पंपचालक-मालक यांचे कर्तव्य आहे. पंपावरील स्वच्छतागृहे, तसेच अन्य काही सुविधा यांसाठी शासन पेट्रोल पंपचालकांना अनुदानही देते. त्यामुळे ग्राहकांसाठी सुविधा देणे पंपचालकांना बंधनकारक आहे; मात्र ते याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात.
‘संबंधित आस्थापनाचे पहाणी अधिकारी प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर जाऊन पडताळणी करतात कि केवळ कागदोपत्री पडताळणी अहवाल दिले जातात ?’, हाही एक प्रश्नच आहे. पेट्रोल विकणार्या आस्थापनाचे अधिकारी, तसेच केंद्रीय भरारी पथक, पुरवठा अधिकारी, स्थानिक प्रशासकीय अधिकारी वर्ग यांचे पराकोटीचे दुर्लक्ष, तसेच जनतेची आपल्या समस्यांप्रती असलेली असंवेदनशीलता ही दु:स्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी भारताच्या सुजाण नागरिकांनी आणि संबंधित अधिकारी वर्गाने एकत्रित येऊन प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, गोवा.