एस्.टी.त तिकीटाचे पैसे आता ‘ऑनलाईन’ देता येणार !

  • राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती

  • दीड मासात योजना चालू होणार !

मुंबई – एस्.टी.च्या बसगाड्यांमध्ये तिकीट देण्यासाठी ‘अ‍ॅन्ड्रॉइड मशीन’चा वापर केला जाणार आहे. येत्या दीड मासात राज्यातील १०० टक्के एस्.टी. गाड्यांमध्ये ‘अ‍ॅन्ड्रॉइड मशीन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना ‘गूगल पे’, ‘पेटीएम्’ यांद्वारे तिकिटाचे पैसे देता येतील, अशी माहिती एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. राज्यशासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखतीत ते बोलत होते.

शेखर चन्ने पुढे म्हणाले की,

१. एस्.टी. महामंडळ स्वत:च्या पायावर उभे असायला हवे. यापूर्वी एस्.टी. महामंडळ  स्वत:चा व्यय स्वत:च भागवत होते. कोरोनानंतर मात्र महामंडळावर परिणाम झाला; परंतु आता पुन्हा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

२. एस्.टी.च्या राज्याभरातील जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. इंधनावरील व्यय अल्प करण्यात येत आहे. गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. एस्.टी. महामंडळामध्ये प्रथमच ५० ‘स्लीपर कोच’ गाड्या येत आहेत.

३. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक अभियाना’च्या अंतर्गत २ मासांतून बसस्थानकांचे परीक्षण केले जाते. बसस्थानकांवरील प्रत्येक घटकाच्या स्वच्छतेसाठी गुण निश्‍चित करण्यात आले आहेत. यातून सरासरी गुण एकत्रित करून सर्वाधिक गुण असलेल्या बसस्थानकांना पारितोषिक दिले जाणार आहे.

४. यापूर्वी एस्.टी. बसमधून नियमित प्रवास करणार्‍या महिलांची संख्या १२ लाख इतकी होती; मात्र महिलांसाठी देण्यात येत असलेल्या सवलतीनंतर ही संख्या १८ ते २० लाखापर्यंत वाढली आहे.

बसस्थानकांच्या आवारात दिसणार नाहीत चिखल आणि खड्डे !

बसस्थानकांतील रस्त्यांच्या ‘काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यापुढे बसस्थानकांच्या आवारात चिखल आणि खड्डे दिसणार नाहीत. खासगी संस्थांना बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. प्रसाधनगृहांसाठी किरकोळ शुल्क आकारण्यात येणार आहे.

बसस्थानकांवर सौरऊर्जेचा वापर करणार !

राज्यात ५ सहस्र १५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. या बस जिल्हा आणि तालुका पातळीवर धावतील. या गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही.  डिझेलवर चालणार्‍या राज्यातील १ सहस्र बस ‘सीएन्जी’मध्ये, तसेच ५ सहस्र बस ‘एल्.एन्.जी.’ इंधनामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. येत्या काळात राज्यातील बसस्थानकांवर सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे, अशीही माहिती शेखर चन्ने यांनी दिली.