यापुढे धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ताळगाव येथील पाद्रयाने हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पणजी, ८ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात कुणीही कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्यास सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहे, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांचीही उपस्थिती होती. राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. चिखली, वास्को येथील चर्चचे पाद्री बॉलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हल्लीच ताळगाव येथील एका चर्चच्या पाद्रयाने हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. ताळगाव येथील पाद्रयाने केलेले हे विधानाचे चलचित्र (व्हिडिओ) सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी या चलचित्राकडे (व्हिडिओकडे) लक्ष वेधले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही चेतावणी दिली आहे.

(सौजन्य : OHeraldo Goa) 

डॉ. सावंत पुढे म्हणाले,

‘‘कुणीही दुसर्‍या धर्मावर टीका करू नये. कुणी कुणाच्या देवाला मानावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. त्यामुळे हिंदु किंवा ख्रिस्ती यांनी एक दुसर्‍याच्या धर्मावर बोलू नये.’’

धार्मिक पिठाचा गैरवापर नको ! – सा.बां. मंत्री नीलेश काब्राल

‘‘दुसर्‍याच्या धर्मावर कुणीही कुठेही बोलणे चुकीचे आहे. दुसर्‍याच्या धर्मावर बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही. अशा व्यक्तीला कह्यात घेतले पाहिजे. धार्मिक पिठाचा वापर दुसर्‍या धर्मावर टीका करण्यासाठी अजिबात होता कामा नये. घटनेनुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासंबंधी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.

ताळगाव येथील पाद्रयाने चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी केलेले वक्तव्य !

‘मी हिंदु मुलाच्या प्रेमात पडले, त्या मुलाने मला देवळात नेले आणि मी त्या देवाला नमस्कार केला’, असे आपल्या धर्मातील अनेक जण मला येऊन सांगतात. मी त्यांना सांगतो, ‘‘तू मोठे पाप केले आहेस. खोट्या आणि आंधळ्या देवाकडे तू कसली मागणी केली ? त्या मुलाचा देव तुझा देव होऊ शकत नाही. देवाचा खेळ करून तुम्हाला शांती लाभणार का ? चर्च संस्था आंतरधर्मीय चर्चा घडवून आणते. ती खोट्या किंवा आंधळ्या देवाला मानण्यासाठी नव्हे, तर ‘सांताना’ची (खिस्त्यांचे श्रद्धास्थान) ओळख इतरांना व्हावी आणि सत्य त्यांना समजावे, हा आंतरधर्मीय चर्चा घडवून आणण्याचा उद्देश आहे.’’ (म्हणजे ख्रिस्त्यांचे देव सत्य आहेत आणि हिंदूंचे देव खोटे अन् आंधळे आहेत, असेच या पाद्रयांकडून इतरांना सांगितले जाते. असा उद्देश असलेल्या आंतरधर्मीय चर्चा घेणे म्हणजे धर्मांधताच होय ! – संपादक)