गायीच्‍या शेणापासून सिद्ध केलेल्‍या साबणामुळे त्‍वचाविकार होत नाहीत ! – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

पुणे – ‘गायीच्‍या शेणापासून सिद्ध केलेला साबण मी अनेक वर्षे वापरत आहे त्‍यामुळेच मला कोणतेही त्‍वचाविकार झाले नाहीत’, असे मत राज्‍याचे उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्‍यक्‍त केले. महाराष्‍ट्र गोसेवा आयोगाच्‍या मुख्‍यालयाच्‍या उद़्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. (गायीपासून मिळणार्‍या उत्‍पादनांचे अनन्‍य साधारण महत्त्व लक्षात घेऊन गोरक्षण करणे किती आवश्‍यक आहे, हे शासनाने लक्षात घ्‍यायला हवे. – संपादक)

गायीच्‍या दुधापेक्षा गोमूत्राची किंमत वाढणार आहे. कर्करोगावरील औषधांच्‍या निर्मितीमध्‍येही गोमूत्राला महत्त्व प्राप्‍त होत आहे. गायीचे शेण जाळल्‍याने हवेतील जंतू मरतात, असेही ते म्‍हणाले. यावेळी आयोगाचे अध्‍यक्ष आणि पशूसंवर्धन आयुक्‍त यांच्‍यासह आयोगाचे सदस्‍य उपस्‍थित होते. भारतीय समाजात गायींची प्रतिष्‍ठा निर्माण करण्‍याच्‍या आणि गोवंश वाढवण्‍याच्‍या संकल्‍पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्‍यांना गोसेवा आयोग स्‍थापन करण्‍याचे आवाहन केले आहे. त्‍या अन्‍वये गायींचे संरक्षण आणि संवर्धन करणे, गोरक्षकांना साहाय्‍य करणे, गाईचे दूध, शेण आणि मूत्र यांपासून सिद्ध होणार्‍या उत्‍पादनांना समाजात प्रतिष्‍ठा मिळवून देणे आदी कामे आयोगाकडून केली जाणार आहेत आणि त्‍याला सर्वतोपरी साहाय्‍य करणार असल्‍याचे पाटील यांनी नमूद केले.