पुणे येथे दहीहंडी उत्‍सवात क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्‍ये हाणामारी !

पुणे – येथे प्रत्‍येक चौकात दहीहंडी उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला; मात्र याच उत्‍सवाला अनेक ठिकाणी गालबोटही लागले. काही ठिकाणी मुलींची छेड काढली गेली, तर काही ठिकाणी क्षुल्लक कारणांवरून तरुण भिडले. तरुणांमध्‍ये हाणामारी झाली. एका ठिकाणी धारदार शस्‍त्राने वार करण्‍यात आला.

दहीहंडीच्‍या वेळी घडलेल्‍या घटना !

१. दहीहंडी पहात असतांना धक्‍का लागल्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या वादातून एका तरुणावर धारदार शस्‍त्राने वार करण्‍यात आले. यात एक तरुण घायाळ झाला आहे. ही घटना ‘सिंहगड कॉलेज कँपस’मध्‍ये असलेल्‍या एम्.बी.एन्. कॉलेज समोरील सार्वजनिक रस्‍त्‍यावर घडली.

२. आप्‍पा बळवंत चौकात दहीहंडी फुटल्‍यानंतर २ गटांत वाद होऊन हाणामारी झाली. हा वाद ढोल-ताशा पथकाचे कार्यकर्ते आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्‍यात झाला होता.

दहीहंडी हा श्रद्धा आणि भक्‍ती वाढवण्‍यासाठीचा धार्मिक उत्‍सव आहे. अशा उत्‍सवाला साहसी खेळाचे स्‍वरूप आल्‍याने, तसेच स्‍पर्धा, ईर्ष्‍या, जीवघेणा थरार यांचा शिरकाव झाल्‍याने त्‍याला बाजारू स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे. संस्‍कृतीची जपणूक करण्‍यासाठी अशा उत्‍सवाला विधायक स्‍वरूप आणण्‍याची आज पुष्‍कळ आवश्‍यकता आहे.