देहलीत आजपासून ‘जी-२०’ परिषद !

नवी देहली – येथे ९ सप्टेंबर या दिवशी राजधानी देहलीतील ‘भारत मंडपम्’ या भव्य सभागृहामध्ये ‘जी-२०’ शिखर परिषदेस प्रारंभ होणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेला २८ देशांचे प्रमुख आणि युरोपीयन युनियनचे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.  यंदा ‘जी-२०’ परिषदेचे अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. या परिषदेसाठी येणार्‍या पाहुण्यांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. जगातील शक्तीशाली देशांचे प्रमुख येत असल्याने देहलीतील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्यासाठी ५० सहस्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

काय आहे ‘जी २०’ परिषद ?

‘जी-२०’ सदस्य देशांचा समूह असून तो जागतिक ‘सकल राष्ट्रीय उत्पना’च्या, म्हणजे ‘जीडीपी’च्या अंदाजे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या संदर्भात ७५ टक्क्यांंहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतात. ‘जी-२०’ परिषदेत मुख्यत्वे आतंकवाद, आर्थिक समस्या, जागतिक हवामान पालट, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर भर दिला जातो.

जी-२० परिषदेतील देश !

‘जी-२०’ देशांच्या परिषदेत अमेरिका, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, मेक्सिको, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया,  इटली, तुर्कीए, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, भारत, चीन, जपान, इंडोनेशिया, कोरिया प्रजासत्ताक आणि युरोपीयन युनियन यांचा समावेश आहे. या परिषदेत अध्यक्ष असणार्‍या भारताने ९ अन्य देशांना आमंत्रित केले आहे. यात बांगलादेश, मॉरिशस, नायजेरिया, ओमान आदींचा समावेश आहे.

भारतात परिषदेला उपस्थित रहाणारे राष्ट्रप्रमुख !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फिमियो किशिदो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीज, जर्मन चान्सलर, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, दक्षिण अफ्रीका, तुर्कीये आणि अर्जेंटिनाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी काही कारणास्तव उपस्थित रहाण्यास नकार दिला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री आणि चीनचे पंतप्रधान या परिषदेस उपस्थित रहाणार आहेत.