गोवा : प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री केल्यास कठोर कारवाई करणार !
हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण आर्लेकर यांची चेतावणी
पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पुन्हा एकदा दिली आहे.
MLA Pravin Arlekar: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती केल्यास कारवाईhttps://t.co/9y3KIc426V#Goa #Ponda #GaneshIdol #DainikGomantak
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) September 2, 2023
ते म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती परराज्यातून गोव्यात येऊ नयेत, यासाठी राज्याच्या सीमांवर कठोरपणे देखरेख ठेवली जाणार आहे. महामंडळाच्या अधिकार्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.’’
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यापूर्वी अन्य एका ठिकाणी कार्यक्रमात म्हणाले, ‘‘यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीला १०० टक्के आळा बसेल, असे नाही; मात्र पुढील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एकाही श्री गणेशमूर्तीची विक्री होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. ज्यांच्या मूर्तीशाळेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आहेत, त्यांना यंदापासून महामंडळ अनुदान देणार नाही.’’ राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर गेल्या काही वर्षांपासून बंदी आहे. हस्तकला महामंडळ प्रतिवर्ष चिकण मातीपासून बनवलेल्या प्रत्येक श्री गणेशमूर्तीमागे १०० रुपये अनुदान देते. हस्तकला महामंडळाने श्री गणेश मूर्तीशाळांना यंदा मोठ्या प्रमाणात माती मळणी यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत.
(सौजन्य : Prudent Media Goa)
गतवर्षी ३६ पैकी ९ विक्रेत्यांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चाचणीतून उघड !
गतवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची गोव्यात होणारी आयात रोखण्यासाठी गोवा सरकारने अबकारी खाते आणि पर्यावरण खाते यांतील अधिकार्यांचे अनेक गट सिद्ध केले होते. हे गट राज्यांच्या सीमांवर नेमण्यात आले होते; मात्र तरीही गतवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री झाली. गतवर्षी श्री गणेशचतुर्थीच्या १० दिवस पूर्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभरातून श्री गणेश मूर्तीशाळा आणि श्री गणेशमूर्ती विक्री केंद्रे यांच्याकडील श्री गणेशमूर्तींचे एकूण ३६ नमुने घेऊन त्यांची चाचणी केली होती आणि यामधील ९ विक्रेते प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींची विक्री करत असल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले होते.
हे ही वाचा –
♦ गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप
https://sanatanprabhat.org/marathi/706981.html
संपादकीय भूमिकावर्ष २०१३ पासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीवर गोव्यात बंदी असूनही १०० टक्के बंदीची कार्यवाही न होणे पर्यावरणासाठी धोकादायक असण्याबरोबरच ही स्थिती प्रशासनासाठी लज्जास्पद ! |