मिरज येथील ऐतिहासिक गणेश तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जनास प्रशासनाची अनुमती !
श्रीमंत राजेसाहेब पटवर्धन सरकार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वय समितीचा निर्वाळा
मिरज, ७ सप्टेंबर (वार्ता.) – येथील ऐतिहासिक मिरज गणेश तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जनास अधिकृतरित्या अनुमती देण्यात आली आहे. येथील सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासन अन् श्रीमंत राजेसाहेब पटवर्धन सरकार यांच्यातील ‘गणेश तलावा’च्या संदर्भातील १० वर्षांचा करार वर्ष २०२२ मध्ये संपुष्टात आला आहे. काही गोष्टींमुळे या कराराचे नूतनीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी श्री गणेशमूर्ती विसर्जनास अडथळा निर्माण होऊ नये, तसेच विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन सरकार, महापालिका उपायुक्त स्मिता पाटील, माजी नगरसेवक निरंजन आवटी, अधिवक्ता श्रीकृष्ण कोथकुळे, श्री. आेंकार शुक्ल, श्री. जयगोंड कोरे, श्री. तानाजी रुईकर यांच्यासह श्री गणेशमूर्ती विसर्जन समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीच्या माध्यमातून श्री गणेशमूर्ती विसर्जनास अडथळा न करता गणेश तलाव येथे विसर्जनास अनुमती देण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. श्रीमंत राजेसाहेबांनी काही दिवसांपूर्वी तलावातील सर्व फाटकांना लावलेले कुलूप श्री गणेशभक्तांनी तोडल्याने निर्माण झालेला तंटा यामुळे मिटला.