परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या विरार (जिल्हा पालघर) येथील सौ. विभूती गायकवाड (वय ३८ वर्षे) !
श्रावण कृष्ण नवमी (८.९.२०२३) या दिवशी विरार (जिल्हा पालघर) येथील सौ. विभूती गायकवाड यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची नणंद (यजमानांची बहीण) सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सौ. विभूती गायकवाड यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. मागील वर्षी वाढदिवसाच्या दिवशी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर ‘त्यांनीच साधनेला गती दिली’, याची अनुभूती येणे
‘वर्ष २०२२ मधील वाढदिवसाच्या दिवशी माझ्या वहिनी सौ. विभूती गायकवाड यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेव, मला साधनेत येऊन अनेक वर्षे झाली; पण माझ्या प्रयत्नांना गती येत नाही, तरी आता आपणच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या.’ त्यानंतर वर्षभरात वहिनींनी स्वतः ठरवून असे काही प्रयत्न केले नाहीत; पण त्यांच्या लक्षात आले, या वर्षभरात त्या ‘प्रथमोपचार वर्गाला जाणे, अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी बाहेर जाणे, प्रासंगिक सेवांमध्ये सहभागी होणे’, अशा सेवा करू लागल्या. मागील वर्षाच्या तुलनेत त्यांच्या सेवेची गती वाढली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर त्यांनीच साधनेला गती दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातून त्यांना जाणीव झाली, ‘गुरुदेवांना केलेली प्रत्येक प्रार्थना ते ऐकतात आणि साधकासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व करतात.’ ‘वाढदिवसाच्या दिवशी देवाला प्रार्थना करून संकल्प केल्यावर साधकाला कसा लाभ होतो !’, हेही त्यांना शिकता आले. यातूनच ‘हिंदु धर्मातील प्रत्येक गोष्ट किती अर्थपूर्ण आहे !’, याचाही उलगडा झाला.
२. या वर्षी (वर्ष २०२३ मध्ये) वहिनी प्रथमच वाढदिवसाच्या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आहेत. ‘ही गुरुदेवांनी त्यांना दिलेली सुंदर भेट असून त्यांनी मागील वर्षी केलेल्या प्रार्थनेचे ते फळ आहे’, असे मला वाटते.
३. वहिनी दिवसभर गुरुदेवांचे स्मरण करतात. त्या परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलत असतांना त्यांचे भावपूर्ण बोलणे ऐकून आपणही भावविश्वात जातो.
४. शेजार्यांना साधनेचे महत्त्व सांगणे
वहिनींनी त्यांच्या शेजार्यांना साधनेचे महत्त्व आणि नामजपादी उपाय यांविषयी सांगितले आहे. शेजारच्या लहान मुलांना स्वतःच्या घरी बोलावून वहिनी त्यांच्याकडून नामजप करून घेतात. त्यामुळे ‘अडचणींवर उपाय मिळतो’, असे शेजार्यांच्याही लक्षात आले आहे.
५. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या संदर्भात आलेली अनुभूती !
५ अ. लहान मुलीचे डोके दुखत असतांना वहिनींनी तिच्या हातात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ देऊन तिला ‘गुरुदेवांना सर्व सांग’, असे सांगणे : वहिनींच्या शेजारी ६ – ७ वर्षांची एक लहान मुलगी रहाते. ती नामजपादी उपाय करते. एकदा तिचे डोके पुष्कळ दुखत होते. तिने वहिनींना काहीतरी उपाय करण्यास सांगितले. तेव्हा वहिनीने तिच्या हातात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दिला आणि सांगितले, ‘‘गुरुदेवांना सर्व सांग.’’ ती छोटी मुलगी १० मिनिटे हातांत ग्रंथ घेऊन गुरुदेवांना सूक्ष्मातून सर्व सांगत होती. त्या वेळी वहिनी तिचे काम करत होती.
५ आ. लहान मुलीने परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवल्याचे सांगणे, त्या वेळी तिची आणि वहिनींची भावजागृती होणे अन् नंतर मुलीची डोकेदुखी बरी होणे : १० मिनिटांनी त्या मुलीने सांगितले, ‘‘डॉक्टरबाबा (परात्पर गुरु डॉक्टर) आले होते. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले, ‘गोव्याला ये. मी तुझी वाट पहात आहे. इकडे आलीस की, मी तुला पुष्कळ चॉकलेट देईन.’’ हे सांगतांना तिची आणि वहिनींची भावजागृती झाली. त्यानंतर तिची डोकेदुखी थांबून तिला बरे वाटले. त्या छोट्या मुलीला ‘परात्पर गुरु डॉक्टर गोव्यात असतात आणि त्यांना लहान मुले आवडतात’, हे ठाऊकही नव्हते.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (सौ. विभूती गायकवाड यांची नणंद, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०२३)
|