साधकांनी अनुभवलेला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्‍सव सोहळा ! 

‘वैशाख कृष्‍ण सप्‍तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ८१ व्‍या वर्षांत पदार्पण केले. त्‍या दिवशी रथोत्‍सव झाला. या सोहळ्‍याचे वर्णन करायला खरोखरच शब्‍द अपुरेच पडतील, तरीही मी या सोहळ्‍याचे वर्णन करण्‍याचा अल्‍पसा प्रयत्न करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. शंखनादाने दिंडीला प्रारंभ होणे

‘गुरुदेवांच्‍या जन्‍मतिथीच्‍या दिवशी (२२.५.२०२२) भव्‍य दिंडी काढण्‍यात आली. दुपारी ४ वाजता शंखनाद झाला आणि दिंडीला प्रारंभ झाला. ‘श्रीमन्‌नारायण नारायण हरि हरि’, हे भजन म्‍हणत दिंडी मार्गक्रमण करू लागली. हातात फलक आणि ध्‍वज घेतलेले साधक, साधिका सात्त्विक पोषाखात श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांच्‍या नामाचा गजर करत दिंडीतील अनवाणी साधकांसह मार्गक्रमण करत होतेे. त्‍यांच्‍या मागे सुंदर सजवलेल्‍या पालखीत ‘श्रीराम शाळिग्राम’ ठेवला होता. मी पालखीतील ‘श्रीराम शाळिग्रामाचे’ भावपूर्ण दर्शन घेत होते. तेव्‍हा माझ्‍या डोळ्‍यांतून सतत भावाश्रू वहात होते.

२. रथात बसलेल्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना पाहून सर्व साधकांची भावजागृती होणे

पालखीच्‍या मागे एक सुंदर सुशोभित केलेला आणि ७ घोड्यांची प्रतिकृती असलेला रथ होता. त्‍या रथात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, म्‍हणजे साधकांचे लाडके गुरुदेव सिंहासनावर बसले होते. त्‍यांच्‍या चरणांशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या गुरुदेवांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी बसल्‍या होत्‍या. साधकांचा आपल्‍या डोळ्‍यांवर विश्‍वासच बसत नव्‍हता. ‘आपण स्‍वप्‍न पहात नाही ना !’, असे साधकांना वाटले. हे सगळे अनपेक्षितच होते. प्रत्‍यक्ष गुरुमाऊलीकडे पाहून इतका आनंद झाला की, साधकांची दृष्‍टी त्‍यांच्‍यावर खिळून राहिली होती. डोळ्‍यांतील गंगा-जमुनासुद्धा नारायणाच्‍या दर्शनासाठी वेगाने वाहू लागल्‍या.

३. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना श्रीविष्‍णूच्‍या रूपामध्‍ये पाहून सर्व साधकांची भावजागृती होणे आणि साधकांना पाहून गुरुदेवांचीही भावजागृती होणे

(पू.) सौ. शैलजा परांजपे

गुरुमाऊली श्रीविष्‍णूच्‍या वेशात होती. डोक्‍यावर मुकुट, पितांबर, निळा शेला आणि अंगावर दागदागिने, त्‍यांच्‍या डाव्‍या हातात गदा असून ते उजव्‍या हाताने सगळ्‍यांना आशीर्वाद देत होते. त्‍यांच्‍या शेजारी शंख ठेवला होता. ‘ते श्रीविष्‍णूचे रूप पहातच रहावे’, असे वाटले. त्‍यांना पाहून सर्व साधकांची आनंदाने भावजागृती झाली. साधकांना पाहून गुरुदेवांचीही भावजागृती होत होती. ‘भक्‍त जसा देवाच्‍या दर्शनासाठी भुकेलेला असतो, तसा देवही भक्‍ताच्‍या भेटीसाठी भुकेलेला असतो. कितीतरी दिवसांत गुरुदेवांचे कुणालाच दर्शन झाले नव्‍हते. गुरुदेवांना पाहून असे वाटले, ‘त्‍यांना साधकांशी पुष्‍कळ बोलायचे आहे आणि साधकांना पुष्‍कळ काही सांगायचे आहे.’

या दिंडीसाठी अनेक साधक आले होते. गावातील लोकही आले होते. ते मार्गावर दुतर्फा नमस्‍कार करून उभे होते. त्‍यांनासुद्धा ध्‍यानीमनी नसतांना अकस्‍मात् गुरुदेवांचे दर्शन घडले. ज्‍यांना कधीच गुरुदेव दिसत नाहीत, त्‍यांनाही गुरुदेवांना पाहून ‘जन्‍माचे सार्थक झाले’, असे वाटले असेल.

४. सर्व साधक देहभान विसरून आनंदाने दिंडीत सहभागी होणे

त्‍या वेळी मला असे वाटले, ‘देवा, मी या वेळी लहान असते, तर या देवाच्‍या दिंडीत सहभागी झाले असते. देवाच्‍या समवेत अनवाणी चार पावले चालले असते. आम्‍ही पंढरपूरची आषाढी, कार्तिकी वारीची दिंडी कधीच अनुभवली नाही; पण ही दिंडी अनुभवता आली असती. श्रीमन्‌नारायणाची तेवढीच सेवा झाली असती. ज्‍या साधकांना दिंडीत चालण्‍याची सेवा मिळाली, ते किती भाग्‍यवान आहेत !’ मला क्षणभर त्‍यांचा हेवाच वाटला. ‘जे साधक रथाच्‍या समवेत चालत गेले, त्‍यांची अनंत जन्‍मांची पापे फिटली.’ पंढरीच्‍या वारकर्‍यांच्‍या चरणांची धूळ घेतल्‍यावर वारी केल्‍याचे पुण्‍य लाभते, तसे ‘या साधकांच्‍या चरणांची धूळ आपण घ्‍यावी’, असे मला वाटले. पालखीत ‘श्रीराम शाळिग्राम’ असल्‍यामुळे सर्व साधक अनवाणी चालत होते. दिंडी परत आल्‍यावर साधकांना विचारले, ‘‘तुम्‍हाला अनवाणी चालतांना त्रास नाही का झाला ?’’ ते म्‍हणाले, ‘‘आम्‍ही अनवाणी चालत आहोत, याची आम्‍हाला जाणीवच नव्‍हती. एकच विचार मनात होता की, ‘देवासाठी हा देह झिजला नाही, तर या देहाचा काय उपयोग ?’’

५. वरुणराजांनी आशीर्वाद देणे

दिंडीच्‍या ३ दिवस आधी सतत पाऊस पडत होता; पण त्‍या दिवशी सकाळपासून आकाश स्‍वच्‍छ होते. गुरुदेव आणि साधक यांना ऊन अन् पाऊस यांचा त्रास होऊ नये, याची देवालाच काळजी होती. दिंडीच्‍या वेळी ढगाळ वातावरण होते; पण पाऊस नव्‍हता. हवा आल्‍हाददायक होती आणि दिंडी झाल्‍यावर वरुणराज आशीर्वाद देण्‍यासाठी आले.

६. देवाचे कुठलेही कार्य शक्‍तीविना संपन्‍न होत नसल्‍याने गुरुदेवांच्‍या चरणांशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गुरुदेवांच्‍या उत्तराधिकारी बसलेल्‍या असणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून मला असे वाटले, ‘या दोघींनी मागील अनेक जन्‍मांत पुष्‍कळ पुण्‍य केले असेल; म्‍हणून त्‍यांना प्रत्‍यक्ष परमेश्‍वराच्‍या रथात बसायला मिळाले.’ महर्षींनी नाडीपट्टीत सांगितलेच आहे की, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या ‘भूदेवी’ आहेत आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘श्रीदेवी’ आहेत. देवाचे कुठलेही कार्य शक्‍तीविना संपन्‍न होत नाही. त्‍यामुळे गुरुदेव प्रत्‍यक्ष ‘शिव’ आहेत आणि या दोघी शक्‍ती आहेत. ‘शिव तेथे शक्‍ति.’

७. देव रथातून बाहेर पडले, म्‍हणजे ही ‘रामराज्‍याची नांदीच आहे’, असे वाटणे

‘सगुणातून प्रत्‍यक्ष देव दुष्‍प्रवृत्तींच्‍या निर्मूलनासाठी निघाले आहेत. देव रथातून बाहेर पडले, म्‍हणजे ही ‘रामराज्‍याची नांदीच आहे’, असे मला वाटले. ‘आता हिंदु राष्‍ट्र आणि रामराज्‍याची धुरा देवाने या शिव-शक्‍तींच्‍या हातात सोपवली आहे. आम्‍ही सर्व साधक त्‍यांची वानरसेना आहोत’, असे मला वाटले. भगवंता, ‘या हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यासाठी आम्‍हा साधकांकडून तन-मन-धनाने अखंड भावपूर्ण सेवा करून घ्‍या.’

८. साधकांना संदेश

साधकांनो, आपल्‍या देवाच्‍या जन्‍मोत्‍सवासाठी तुम्‍ही तन-मन-धनाने सेवा केलीत आणि ती गुरूंच्‍या चरणी रुजू झाली. गुरूंना जितकी समष्‍टी साधना अपेक्षित आहे, तितकीच व्‍यष्‍टी साधनाही अपेक्षित आहे. व्‍यष्‍टी साधनेने आपले शारीरिक, मानसिक  आणि आध्‍यात्मिक बळही वाढते. व्‍यष्‍टी साधनेमुळे आपण अनिष्‍ट शक्‍तींच्‍या आक्रमणांना तोंड देऊ शकतो. आपले मानसिक बळही वाढते. आपल्‍या वाणीला चैतन्‍य येते. आपल्‍या शरिराभोवती नामाचे अभेद्य कवच निर्माण होते. साधकांनो, आपले शारीरिक आणि मानसिक बळ वाढवून आपण आपल्‍या गुरुदेवांनी जे धर्मकार्य आरंभले आहे, ते समर्थपणे पुढे नेऊया.

‘गुरुदेवा, या आपल्‍या कार्याला आम्‍हा सर्व वयस्‍कर संत आणि साधक यांच्‍याकडून तुम्‍हाला अपेक्षित अशी साधना होऊ दे. आमचा क्षणन्‌क्षण समष्‍टीसाठीच्‍या नामजपात व्‍यतीत होऊ दे, हीच आपल्‍या चरणी मनोभावे प्रार्थना !’

– आपली चरणसेविका,

(पू.) सौ. शैलजा परांजपे, रामनाथी, फोंडा, गोवा. (१७.६.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.