अयोध्येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी चालू आहेत ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येत सध्या ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जात आहेत. अयोध्येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ सप्टेंबरला देहली येथे बैठक घेतली होती. यामध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

३२० कोटी रुपयांचे बांधले जात आहे विमानतळ !

अयोध्येत ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जात आहे. यासाठी ३२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. २ टप्प्यांत हे विमानतळ बांधले जात आहे. विमानतळावरून १५ मिनिटांत श्रीराममंदिरापर्यंत पोचता येईल. तसेच अयोध्येत २१९ कोटी रुपये खर्चून ९ एकर भूमीवर बसस्थानक बांधले जात आहे. जे लोक आपल्या खासगी वाहनाने अयोध्येत येतील, ते जन्मभूमीच्या एक ते दीड किमी आधी वाहनतळात वाहने उभी (पार्क) करतील. यानंतर ई-रिक्शाने मंदिरात जाता येईल.

अयोध्या जंक्शनसाठी होत आहे २३० कोटी रपये खर्च !

अयोध्या जंक्शनसाठी (रस्ते किंवा रेल्वे मार्ग एकत्र मिळतात, त्या ठिकाणासाठी) २३० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. नवीन स्थानक भव्य पद्धतीने उभारण्यात येत आहे. सुमारे १० सहस्र चौरस मीटरमध्ये नवीन इमारत बांधण्यात येत आहे. यामध्ये १२५ खोल्या, वसतीगृह आणि २४ डब्यांच्या ३ फलटांचा समावेश आहे. रेल्वेने श्रीराममंदिरापर्यंत जाण्यासाठी ३ मार्ग आहेत. काशीहून आल्यास अयोध्या जंक्शन येथे उतरावे लागेल. लक्ष्मणपुरी येथून आल्यास अयोध्या कँट आणि गोरखपूरहून आल्यास रामघाट स्थानकावर उतरावे लागेल. अयोध्या जंक्शनपासून राममंदिर केवळ ८०० मीटर अंतरावर आहे, तर अयोध्या कॅन्टपासून ९ किमी आणि रामघाटापासून ३ किमी अंतरावर आहे.

२० पंचतारांकित हॉटेल्स उभी रहाणार !

अयोध्येत २० पंचतारांकित हॉटेल्स बांधली जाणार आहेत. यामध्ये ताज हॉटेलसह अनेक मोठ्या समूहांचा समावेश आहे. तसेच ‘विवांता’ १०० खोल्यांची आणि ‘जिंजर’ १२० खोल्यांची हॉटेल्स उघडणार आहे. ‘रॅडिसन’ आणि ‘ओयो ग्रुप’सुद्धा आलीशान हॉटेल्स बनवण्याच्या सिद्धतेत आहेत.

प्रतिवर्षी १२ कोटी भाविक येणार !

श्रीराममंदिराचे बांधकाम चालू झाल्यानंतर अयोध्येत येणार्‍या पर्यटक आणि भाविक यांची संख्या दुपटीने वाढली आहे. यामुळेच श्रीराममंदिराच्या उभारणीनंतर येथे प्रत्येक मासाला १ कोटी म्हणजेच वर्षाला १२ कोटी भाविक येतील, असा विश्‍वास येथील सरकारी अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

अयोध्येला केवळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित न करता ते हिंदु धर्माचे शिक्षण मिळणारे जागतिक स्तरावरील केंद्र व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे ! यातूनच हिंदु धर्म आणि त्याच्या धार्मिक परंपरा यांचे जतन आणि संवर्धन होईल !