‘गंगा-जमुना तहजीब’ नावाचे षड्यंत्र !
(गंगा-जमुना तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती)
मला एका संस्थेतून गणेश उत्सवात ‘गंगा जमुना तहजीब’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाकरता विचारणा झाली. तेव्हा माझ्या पायाखालची भूमीच सरकली. ‘गंगा जमुना तहजीब म्हणजे काय बोलायचे ?’, असा प्रश्न मी विचारला असता त्यावर ‘हिंदूंचे अन्य धर्मांशी सामाजिक ऐक्य’, या विषयावर बोला. एवढच नव्हे, तर ‘भारत-पाक नागरीक मैत्री, हिंदु-मुसलमान ऐक्य वगैरे विषयांवर बोला’, असा आग्रहही करण्यात आला. मग मला धक्काच बसला !
१. मोगल शासकांनी केलेले अनन्वित अत्याचार
मी त्यांना विचारले, ‘‘या शब्दाची (गंगा जमुना तहजीब) उत्पत्ती कशी आणि कुणी केली ? याविषयी काही सांगू शकता का ?’’ ते म्हणाले, ‘‘आम्ही हा शब्द बर्याचदा ऐकला आहे; म्हणून सांगितले.’’ खरी मेख इथेच आहे.
आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात गंगा नदीचे महत्त्व अनन्य साधारण आहे आणि त्यासह गंगा, सिंधु, सरस्वती, यमुना, गोदावरी आणि नर्मदा वगैरे नद्यांचे माहात्म्यही महत्त्वाचे आहे. यमुना ही देहलीच्या जवळून वहाते. देहलीवर (इंद्रप्रस्थावर) मोगलांनी आक्रमण करून ती कह्यात घेतल्यावर अकबर, औरंगजेब, शहाजहां वगैरे मंडळींचे राज्य होते. त्यांनी केलेले अनन्वित अत्याचार, धर्मांतर, मंदिरे पाडून केलेले मूर्तीभंजन, छत्रपती शंभूराजे आणि गुरु तेगबहाद्दुर यांची हत्या, शीख गुरूंचे संहार, राजपूत स्त्रियांनी केलेला जोहार, जनानखाने, जिझिया कर, जिहाद हे आम्ही विसरलेलो नाहीत. आज देहली हिंदुस्थानची राजधानी आहे.
२. आपण यमुनेवरचा हक्क का सोडत आहोत ?
आयोजकांना विचारले, ‘‘गंगा आमची आणि यमुना त्यांची (मुसलमानांची) अशी वाटणी कुणी, कधी अन् का केली ? मुळात हिंदुस्थानातून वहाणार्या सर्व नद्या आम्हाला वंदनीय आहेत. त्यांच्या काठावर असणारी मंदिरे, आश्रम ही तीर्थक्षेत्रे आमची आहेत. मग गंगा आणि यमुना अशी तहजीब का ? गंगा यमुनेच्या काठी आमची संस्कृती पूर्वापार नांदली आहे. आमचे गोपाळकृष्ण, गोपगडी आणि गायी-वासरांसह यमुनेत बागडले आहेत, तिथे खेळ खेळले आहेत. मग ही यमुना त्यांना का बहाल करत आहात ? सिंधु तर त्यांनी (पाकिस्तानने) बळकावली आहे, मग आता तुम्हीच अशी विधाने करून यमुनेवरचा हक्क का सोडत आहात ?’’, असे प्रश्न विचारल्यावर मग मात्र आयोजकांनी मला सांगितले, ‘‘मी चौकशी करून दोन दिवसांत कळवतो.’’ त्यामुळे ‘कृपा करून असले शब्दप्रयोग योजू नका’, ही विनंती आहे.
३. गंगा ही आमचीच (हिंदूंचीच) आणि यमुनाही आमचीच !
जोपर्यंत ते (धर्मांध) अल्पसंख्यांक असतात तोपर्यंतच ते ‘बंधुभाव’ म्हणतात, तोपर्यंत ‘सेक्युलर’ (निधर्मी) देशाचे गोडवे गातात, ज्या दिवशी ते बहुसंख्य होतात त्या दिवशी मात्र देश ‘इस्लामी’ घोषित करतात. जगात ५६ देश इस्लामी आहेत, हे लक्षात राहू द्या. याच यमुनेच्या काठावर आमच्या लाखो मराठा सैनिकांनी सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वात प्राणांची आहुती देऊन अब्दालीच्या वरवंट्यापासून हिंदुस्थानास वाचवले होते. त्या पराक्रमामुळे पुढे कुणीही हिंदुस्थानावर उत्तरेकडून आक्रमण करण्यास धजावला नाही. ती यमुना तुम्ही त्यांना स्वत:हून बहाल का करता ? गंगा ही आमचीच आणि यमुनाही आमचीच आहे.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग.