चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांतील युवकांना राज्यशासन देणार वैमानिक प्रशिक्षण !
मुंबई – अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि आदिवासी समाजातील मुलांना वैमानिक होता यावे, यासाठी गडचिरोली अन् चंद्रपूर येथील युवकांना वैमानिक होण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी चंद्रपूर येथे ‘फ्लाईंग क्लब’ उभारण्यासाठी राज्यशासनाने अनुमती दिली आहे.
मंत्रालयामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक न्याय विभाग आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. ते म्हणाले, ‘‘प्रशिक्षण देण्यासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. उद्योगपतींकडून शिकवण्यासाठी विमाने मिळण्यासाठीही कार्यवाही केली जाईल. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना २०० घंट्यांचे प्रशिक्षण देता येईल. यासाठी आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यात येईल.’’