भारतीय बनावटीच्या खेळण्यांच्या ‘इंडियन टॉईज मेला डॉट कॉम’ संकेतस्थळाचे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते उद़्घाटन !
फोंडा (गोवा) – ‘टॉय अँटीका (ओपिसी) प्रा.लि.’ या आस्थापनाच्या वतीने चालू करण्यात आलेल्या ‘इंडियन टॉईज मेला डॉट कॉम’ (indiantoysmela.com) या संकेतस्थळाचे उद़्घाटन ७ सप्टेंबर २०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळावर संपूर्णपणे भारतीय बनावटीची लाकडी, कापडी, मातीची, दगडी, तसेच धातूची खेळणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
भारतीय बनावटीची खेळणी मिळण्यासाठीचे व्यासपीठ म्हणजे ‘इंडियन टॉईज मेला’चे संकेतस्थळ !
‘सध्या चिनी बनावटीच्या खेळण्यांनी संपूर्ण भारतीय बाजारपेठ व्यापून टाकलेली आहे. खरेतर आजही भारतभर अनेक ठिकाणी पारंपरिक खेळणी सिद्ध करणारे अनेक उत्पादक आहेत; परंतु त्यांना उत्पादनाचे वितरण (मार्केटिंग) कसे करावे ? आधुनिक पद्धतीने त्याचे सादरीकरण कसे असावे ? यांविषयी ठाऊक नाही. त्यामुळे हळूहळू हे कौशल्य असणार्या कारागिरांची संख्याही न्यून होत आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात आपल्या मातीतील आणि हिंदु संस्कृतीची खरी ओळख असणारी ही खेळणी टिकून रहायला हवी ! ‘अस्सल भारतीय बनावटीची दर्जेदार खेळणी योग्य दरात आणि एका क्लिकवर उपलब्ध व्हावीत, तसेच ती बनवणार्या स्थानिक कुशल कारागिरांना त्यांची खेळणी विकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही ‘ई-कॉमर्स वेबसाईट’ (इलेक्ट्रॉनिक व्यापारी संकेतस्थळ) चालू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ही खेळणी ६ मास ते १२ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी एक आगळीवेगळी भेट ठरणारी आहेत. तरी आपण या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी’, असे आवाहन या संकेतस्थळाचे संचालक श्री. मयूरेश कोनेकर यांनी केले आहे.