पोलीस हवालदाराकडून पोंबुर्पा येथील विवाहित महिलेचा विनयभंग
भारतीय राखीव दलातील पोलीस हवालदाराला अटक
पोलिसांनी महिलांचा विनयभंग करणे, गुन्हेगारांशी हातमिळवणी करणे, यांसारखे गुन्हे समोर येत आहेत. यातून ‘जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत’, अशी प्रतिमा पोलिसांची बनत असून जनतेमध्ये पोलिसांविषयी अविश्वास निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने पोलिसांना प्रशिक्षण देतांना साधनेद्वारे नैतिकता रुजवणे अपेक्षित आहे !
पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – पोंबुर्पा येथील एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी भारतीय राखीव दलातील पोलीस सूरज सक्सेना याला अटक केली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार सूरज सक्सेना हा चिंबल येथील रहिवासी असून १ सप्टेंबर २०२३ या दिवशी त्याने पोंबुर्पा येथे एका विवाहित महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला, तसेच त्याने या महिलेच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली.
पोलीस अधिकार्याने विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याचे प्रकरण
गोवा विद्यापिठातील चौकशी समितीसमोर पोलीस अधिकार्याने आरोप फेटाळला !
पणजी – गोवा विद्यापिठातील २ विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप असलेल्या पोलीस अधिकार्याला गोवा विद्यापिठातील अंतर्गत चौकशी समितीसमोर उभे करण्यात आले; परंतु या वेळी पोलीस अधिकार्याने त्याच्यावरील आरोप फेटाळला आणि समितीने सुचवल्याप्रमाणे संबंधित २ मुलींची क्षमा मागण्यासही नकार दिला. या २ विद्यार्थिनींनी या पोलीस अधिकार्याच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने ‘गोवा विद्यापिठाच्या अंतर्गत चौकशी समितीने यासंबंधी चौकशी करून १३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अहवाल द्यावा’, असा आदेश दिला होता. यापूर्वी विद्यापिठाच्या अंतर्गत चौकशी समितीने या पोलीस अधिकार्याला अनेकदा नोटीस पाठवली; परंतु नोटिसीकडे दुर्लक्ष करून तो समितीसमोर उपस्थित राहिला नाही. (असे पोलीस कायद्याचे रक्षण काय करणार ? – संपादक) या विद्यार्थिनी पोलीस अधिकार्याच्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून गेल्या असतांना या अधिकार्याने असभ्य वर्तन केले, असा आरोप गोवा विद्यापिठातील या २ विद्यार्थिनींनी केला आहे.