राजापूर येथे पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना आंबोली येथे अटक
सावंतवाडी – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना सावंतवाडी पोलिसांनी आंबोली येथे कह्यात घेतले आहे, तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
राजापूर तालुक्यातील कोंडेतर्फ सौंदळे येथे गोळीबाराची ही घटना घडली होती. याविषयीचा बिनतारी संदेश वाहनाच्या माहितीसह रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षाकडून सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. त्यानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी नाकाबंदी केली. सावंतवाडी-बेळगाव मार्गावर आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करत असतांना एका ‘स्विफ्ट’ गाडीत ३ व्यक्ती प्रवास करत असल्याचे पोलिसांना दिसले. गाडीतून प्रवास करणार्या प्रवीण पवार (रहाणार तांबाळे, मोहोळ), शेखर भोसले (रहाणार खवणे, मोहोळ) आणि प्रेमकुमार चौधरी (गुडामलानी, बाडनेर) या तिघांना पोलिसांनी कह्यात घेतले.
हे तिघे मद्याची अवैध वाहतूक करत होते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार केला होता.