पीडितांच्या हानीभरपाईचे दावे ६ मासांत निकाली काढण्याचा उच्च न्यायालयाचा लवादाला आदेश
बाणस्तारी येथील भीषण अपघाताचे प्रकरण
पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – बाणस्तारी येथील अपघातामध्ये मृत झालेले आणि घायाळ झालेले यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई मिळण्याविषयीचे दावे पुढील ६ मासांत निकाली काढावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मोटर अपघात दाव्यांविषयीच्या लवादाला दिला आहे. त्याचप्रमाणे या अपघाताचे अन्वेषण करणार्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकार्याला ‘येत्या ६० दिवसांत लवादासमोर अहवाल सादर करावा’, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या अपघातातील वाहनचालक मेघना सावर्डेकर यांनी हानीभरपाईपोटी न्यायालयात २ कोटी रुपये जमा केले आहेत. यांपैकी प्रत्येकी ५० लाख रुपये अपघातात मृत्यू झालेले सुरेश फडते आणि अरूप करमाकर यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा करावेत, तसेच या अपघातात घायाळ झालेले शंकर हळर्णकर यांना ४० लाख, वनिता भंडारी यांना ३५ लाख, तर राज माजगांवकर याला २५ लाख रुपये देण्यात यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या अपघातातील वाहनचालक मेघना सावर्डेकर यांनी ‘म्हार्दोळ पोलिसांनी तिला साक्ष (जबानी) देण्यासाठी पाठवलेले समन्स रहित करण्यात यावे’, अशी मागणी करणारी प्रविष्ट केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे तिला साक्ष (जबानी) देण्यासाठी म्हार्दोळ पोलीस ठाण्यात उपस्थित रहावे लागणार आहे.