उदयनिधी यांच्या विरोधात देशातील सर्व पोलीस ठाण्यांत तक्रार करणार ! – मोहन सालेकर, प्रांत मंत्री, विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांत
मुंबई, ६ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु धर्माला नष्ट करण्याची भाषा करणारे उदयनिधी यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी उदयनिधी यांच्या विरोधात तक्रार करणार असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताचे मंत्री श्री. मोहन सालेकर यांनी केले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पूत्र उदयनिधी यांनी हिंदु धर्माची तुलना डेंग्यू, मलेरीया यांच्याशी करून हिंदु धर्माला नष्ट करण्याची भाषा केली. याचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे सहमंत्री श्रीराज नायर, प्रचारप्रमुख नरेंद्र मुजुमदार उपस्थित होते.
या वेळी मोहन सालेकर म्हणाले, ‘‘लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन मुसलमानांची मते मिळवण्यासाठी उदयनिधी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. साम्यवादी नेहमी धर्मनिरपेक्षतेचा दाखला देतात; परंतु एखाद्या धर्माला नष्ट करण्याची भाषा करणे, हे राज्यघटनेला धरून आहे का ? नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्व बाजूंनी पुरोगाम्यांनी टीका केली; परंतु उदयनिधी यांच्या वक्तव्याविषयी सर्व पुरोगामी गप्प आहेत. वर्ष १९९० मध्ये जिहाद्यांनी काश्मिरी पंडितांना नष्ट करण्याची भाषा केली. उदयनिधी यांची भाषाही जिहाद्यांप्रमाणेच आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून कारवाई करावी. हिंदु धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू संयमी आहेत; मात्र भित्रे नाहीत. हिंदु धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास येत्या काळात हिंदू स्वत:ची शक्ती दाखवून देतील.
उदयनिधी यांच्या वक्तव्याविषयीची भूमिका ‘इंडिया आघाडी’ने स्पष्ट करावी ! – श्रीराज नायर, सहमंत्री, विहिंप
साम्यवाद, धर्मनिरपेक्षता यांच्या नावाखाली हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत. उदयनिधी यांच्या वक्तव्याला इंडिया आघाडीतील काही पक्षांनी समर्थन केले आहे. इंडिया आघाडीने याविषयीची भूमिका स्पष्ट करावी. केवळ मतांसाठी प्राचीन काळापासून चालत आलेल्या हिंदु धर्माची अपकीर्ती करणे योग्य नाही.